क्राईम जगत

बुलडाणा हादरले! विवाहितेचे नग्न फोटो इंस्टाग्रामवर व्हायरल

अजय टप

मलकापूर, (प्रतिनिधी): सोशल मीडियाचा वापर करून एका २२ वर्षीय विवाहितेची बदनामी करण्याच्या आणि तिला आत्महत्येच्या उंबरठ्यावर ढकलण्याच्या धक्कादायक प्रकाराने बुलडाणा जिल्हा पुरता हादरून गेला आहे. लोणार तालुक्यातील टिटवी येथील एका आदिवासी विवाहितेचे नग्न फोटो इंस्टाग्रामवर अपलोड करून तिची समाजात बदनामी करणाऱ्या हिंगोली जिल्ह्यातील एका विकृत नराधमावर लोणार पोलीस ठाण्यात गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.

टिटवी येथील रहिवासी असलेल्या २२ वर्षीय आकांक्षा (नाव बदललेले) या सध्या शिक्षण घेत आहेत. ४ जानेवारी २०२६ रोजी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास आकांक्षा यांनी आपल्या दिराचा मोबाईल पाहण्यासाठी घेतला होता. मोबाईलमध्ये इंस्टाग्राम ॲप सुरू केले असता, त्यांच्या धक्कादायक प्रकार समोर आला. ‘radha_hingolikar’ नावाच्या इंस्टाग्राम आयडीवरून आकांक्षा यांचे नग्न फोटो ‘स्टोरी’ म्हणून ठेवण्यात आले होते. हे फोटो पाहून आकांक्षा यांच्या पायाखालची जमीनच सरकली.

या प्रकरणात पीडित आकांक्षाने दिलेल्या जबाबावरून पंढरीनाथ पंडीत थिटे (रा. लिंबाळा हुडी, ता. सेनगांव, जि. हिंगोली) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम ७७, ३५६ (२), ३५१ (२), माहिती तंत्रज्ञान अधिनियमचे कलम ६७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आरोपी हा पीडितेच्या माहेरकडील ओळखीचा असल्याची माहिती समोर येत आहे. ओळखीचा गैरफायदा घेऊन त्याने पीडितेचे खाजगी फोटो मिळवले आणि ते सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर व्हायरल करून एका महिलेच्या अब्रूशी खेळ मांडल्याची माहिती पोलिसांनी दिली. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रकाश सदगिर हे करीत आहेत.

बदनामीच्या धास्तीने आत्महत्येचा प्रयत्न

स्वतःचे नग्न फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे पाहून आकांक्षा या प्रचंड मानसिक तणावाखाली आल्या. समाजातील बदनामी आणि चारित्र्यावर येणाऱ्या शिंतोड्यामुळे त्या नैराश्यात गेल्या. या धक्क्यातून सावरण्याऐवजी, संताप आणि भीतीपोटी त्यांनी दुसऱ्याच दिवशी म्हणजे ५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.३० च्या सुमारास उंदीर मारण्याचे औषध पिऊन जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने, वेळेवर उपचार मिळाल्याने त्यांचे प्राण वाचले, मात्र या घटनेने आरोपीच्या विकृतीचा कळस गाठल्याचे समोर आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *