राजकारण

मलकापूर पालिकेचा ‘काळा’ कारभार: नियम पायदळी, अधिकारी ‘साखरझोपेत’ की ‘लक्ष्मीदर्शनात’ दंग?

अजय टप
मलकापूर (प्रतिनिधी): विदर्भाचे प्रवेशद्वार असलेल्या मलकापूर शहरात सध्या नगरपालिकेच्या कारभाराचे धिंडवडे निघत आहेत. नियमांची उघडपणे पायमल्ली होत असतानाही नगरपालिका प्रशासन कुंभकर्णी झोपेत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. विशेषतः मानस हॉस्पिटल प्रकरणात नियमांना केराची टोपली दाखवण्यात आली असून, यामागे नेमके कोणाचे ‘आशिर्वाद’ आहेत? असा जळजळीत सवाल आता शहरातील चौकाचौकांत विचारला जात आहे.
शहरातील मानस हॉस्पिटलने नगररचनेचे सर्व नियम धाब्यावर बसवून बांधकाम केल्याचा गंभीर आरोप होत आहे. रुग्णालयासाठी आवश्यक असलेली पार्किंगची जागा न सोडल्यामुळे या परिसरात वाहनांची मोठी गर्दी होऊन वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहे. याचा नाहक त्रास सामान्य नागरिकांना आणि रुग्णांना सहन करावा लागत आहे. एवढा मोठा नियमभंग उघड्या डोळ्यांनी दिसत असतानाही मलकापूरचे मुख्याधिकारी, नगररचनाकार आणि बुलढाण्यातील संबंधित वरिष्ठ अधिकारी कारवाईचे धाडस का दाखवत नाहीत? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
अधिकारी हेतुपुरस्सर डोळेझाक करत आहेत की ‘लक्ष्मीदर्शना’मुळे त्यांच्या हातावर बांधल्या गेल्या आहेत?, अशा चर्चांनी आता शहरात जोर धरला आहे. प्रशासनाची ही संशयास्पद शांतता पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे करत आहे.
प्रहारचा ‘प्रहार’ स्टाईल इशारा!
या प्रकरणाची दखल घेत प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. प्रशासनाच्या सुस्त कारभारावर ताशेरे ओढताना त्यांनी शहरात नियमांची पायमल्ली करणाऱ्यांना पाठिशी घालणे बंद करा. नियम मोडणाऱ्यांवर तात्काळ कारवाई झालीच पाहिजे. अन्यथा, प्रहारच्या स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्याचा येईल, असा इशारा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *