चिखलीत काँग्रेसला खिंडार
बुलढाणा,(प्रतिनिधी): चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या स्वतःच्या जिल्ह्यात आणि जिल्हाध्यक्षांच्या मतदार संघात पक्षाला ‘गळती’ लागली असून, चिखलीतील बड्या नेत्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी आमदार श्वेताताई महाले यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. यामुळे चिखलीत काँग्रेसची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, भाजपची ताकद कित्येक पटीने वाढली आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्या उपस्थितीत आणि आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या पुढाकाराने हा ऐतिहासिक सोहळा पार पडला. यात प्रामुख्याने माजी नगराध्यक्ष नंदूभाऊ सवडतकर, काँग्रेस शहराध्यक्ष राहुल सवडतकर, माजी सभापती अरविंद देशमुख, डॉ. गुलाबराव सपकाळ आणि दयानंद खरात यांच्यासह अनेक आजी-माजी सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी भाजपचा झेंडा हाती धरला.
या मोठ्या पक्षांतरामागे दोन मुख्य कारणे समोर येत आहेत. यामध्ये आमदार श्वेताताई महाले यांचा विकास धडाका हे एक कारण असून गेल्या काही वर्षांत चिखली मतदार संघात ग्रामीण आणि शहरी भागात आमदार महाले यांनी केलेल्या विकासकामांचा डोंगर पाहून अनेक निष्ठावान कार्यकर्ते प्रभावित झाले आहेत. तर जिल्हाध्यक्षांची कार्यशैली हे दुसरे कारण असून काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांची वागणूक आणि त्यांची कार्यशैली यामुळे त्रस्त होऊनच कार्यकर्त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये उघडपणे होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाच्या धोरणावर आमचा विश्वास आहे. आमदार श्वेताताई महाले ज्या पद्धतीने मतदारसंघाचा कायापालट करत आहेत, त्याला साथ देण्यासाठीच आम्ही भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या प्रतिक्रिया प्रवेशितांनी दिल्या आहेत. या सोहळ्याला नगराध्यक्ष पंडितदादा देशमुख, सागर पुरोहित, डॉ. कृष्णकुमार सपकाळ यांच्यासह भाजपचे असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पक्षप्रवेशामुळे चिखली विधानसभा मतदारसंघात भाजपची बाजू अधिक भक्कम झाली असून, विरोधकांचे धाबे दणाणले आहेत.
यांनी केले पक्षांतर
चिखलीचे माजी नगराध्यक्ष नंदू सवडतकर, खरेदी विक्री संस्थेचे माजी अध्यक्ष तथा संचालक अरविंद देशमुख, काँग्रेस शहराध्यक्ष राहुल सवडतकर, शेलोडीचे माजी सरपंच दिलीप नरवाडे, रुइखेडचे विद्यमान सरपंच अनिल फेपाळे यांच्यासह अनेक नेत्यांचा यामध्ये सहभाग आहे.

