स्मार्ट बुलढाणा

बुलढाण्याची ‘गुगल गर्ल’! १० सेकंदांत घातले भारताचे २८ प्रदेश पालथे  

मेहकर, (प्रतिनिधी): म्हणतात ना, ‘जिद्द आणि चिकाटी असेल तर आभाळही ठेंगणे असते.’ याचाच प्रत्यय मेहकर तालुक्यातील डोणगावच्या लेकीने दिला आहे. डोणगाव येथील कोमल देविदास खनपटे हिने आपल्या विलक्षण बुद्धिमत्तेच्या जोरावर ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये मानाचे स्थान पटकावले आहे.केवळ १० सेकंदांत भारतातील सर्व राज्यांची नावे अत्यंत अचूकपणे आणि वेगवान पद्धतीने उच्चारून तिने हा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. तिच्या या अचाट वेगामुळे परिसरात तिला आता ‘गुगल गर्ल’ म्हणून ओळखले जात आहे.

कोमल ही डोणगाव येथील शिवाजी हायस्कूलमध्ये इयत्ता १० वीत शिकत आहे. लहानपणापासूनच सामान्य ज्ञानाची आवड असलेल्या कोमलने आपल्या वाचनाच्या छंदाला विक्रमाचे स्वरूप दिले. भारतातील सर्व राज्यांची नावे सलग आणि स्पष्टपणे सांगण्यासाठी तिने केवळ १० सेकंदांचा वेळ घेतला. तिच्या या कामगिरीची दखल घेत इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सने तिला प्रमाणपत्र, मेडल, आयबीआर बॅज आणि ओळखपत्र देऊन सन्मानित केले आहे. तिच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातून कोमलवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

पत्रकार वडिलांचे मार्गदर्शन आणि ग्रामीण प्रतिभा

कोमलचे वडील देविदास खनपटे हे पत्रकार आहेत. घरातील शैक्षणिक वातावरण आणि वडिलांच्या मार्गदर्शनामुळे कोमलला देश-विदेशातील माहिती जाणून घेण्याची ओढ लागली. ग्रामीण भागात सोयीसुविधांची कमतरता असली, तरी बुद्धिमत्ता आणि कष्टाच्या जोरावर जागतिक पातळीवर चमकता येते, हे कोमलने सिद्ध करून दाखवले आहे. “कठोर परिश्रम, सातत्य आणि जिद्द असेल तर कोणतेही ध्येय गाठता येते. मला माझ्या शाळेच्या शिक्षकांचे आणि पालकांचे मोलाचे सहकार्य लाभले.”, अशी प्रतिक्रिया गुगल गर्ल कोमल खनपटे हिने “हिंदवार्ता” शी बोलतांना दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *