महाराष्ट्र माझा

राज्यातील शेतकऱ्यांची २ लाखांपर्यंतची कर्जमाफी जाहीर!

मुंबई,(प्रतिनिधी) : अखेर शेतकरी पुत्राच्या जिद्दीचा विजय झाला! ‘आमदार नाही तर मी सामान्य शेतकरी आहे’ असे म्हणत रस्त्यावर उतरणाऱ्या बच्चू कडू आणि त्यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला आज मोठे यश आले आहे. महाराष्ट्र सरकारने अर्थसंकल्पात २ लाखांपर्यंतची कर्जमाफी आणि नियमित कर्जदारांना ५० हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान जाहीर करून बच्चू कडूंच्या मागणीवर शिक्कामोर्तब केले आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरले होते. सत्तेत असूनही शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सत्तेला लाथ मारण्याची तयारी दाखवणारा नेता म्हणून बच्चू कडूंची ओळख पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. जेव्हा जेव्हा शेतकरी अडचणीत आला, तेव्हा बच्चू कडू यांनी आंदोलनांचे रान पेटवले. “शेतकऱ्याला सात-बारा कोरा हवा, भीक नको हक्क हवा,” ही त्यांची गर्जना आज प्रत्यक्षात उतरली आहे.

प्रहारच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष

ही घोषणा होताच अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि संपूर्ण महाराष्ट्रात प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि गुलाल उधळून जल्लोष केला. “हे केवळ सरकारचे यश नसून बच्चू कडूंच्या प्रामाणिक संघर्षाचे फळ आहे,” अशा भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या आहेत. कर्जमाफी जाहीर झाली असली तरी, ज्या शेतकऱ्यांची नावे तांत्रिक कारणास्तव यादीत येत नाहीत, त्यांच्यासाठी बच्चू कडू यांनी जिल्हास्तरावर मदत कक्ष सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. जेणेकरून एकही पात्र शेतकरी या लाभापासून वंचित राहणार नाही,हे विशेष!

बळीराजाच्या डोळ्यांतील पाणी पुसले!

बच्चू कडू यांनी नेहमीच दिव्यांग आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले आहे. आजच्या कर्जमाफीमुळे केवळ बँकांचे व्यवहार सुधारणार नाहीत, तर आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा असलेला बळीराजा पुन्हा एकदा आत्मविश्वासाने शेती कसायला सज्ज झाला आहे.

पैसे खात्यात जमा होईपर्यंत लक्ष ठेवणार

“आम्ही केवळ घोषणांवर विश्वास ठेवत नाही, तर अंमलबजावणी होईपर्यंत पाठपुरावा करतो. आज सरकारने निर्णय घेतला आहे, आता हा पैसा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईपर्यंत प्रहारचा प्रत्येक कार्यकर्ता लक्ष ठेवून असेल.”: बच्चू कडू (माजी आमदार, प्रहार जनशक्ती पक्ष)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *