‘होते जीवाजी म्हणून वाचले शिवाजी’
आनंद इंगळे
सिंदखेडराजा,(प्रतिनिधी) : “लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे” हा निधड्या छातीचा विचार सार्थ ठरवणारे, छत्रपती शिवाजी महाराजांचे अत्यंत विश्वासू अंगरक्षक वीररत्न जीवाजी महाले यांचा पूर्णाकृती पुतळा मासाहेब जिजाऊंच्या जन्मस्थळी म्हणजेच सिंदखेडराजा येथे बसवण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रीय नाभिक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे की, सिंदखेडराजा ही मासाहेब जिजाऊंची जन्मभूमी असून, या पवित्र मातीने स्वराज्याचे संस्कार घडवले आहेत. याच मातीत शिवरायांच्या स्वराज्यासाठी स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता ‘सय्यद बंडा’चा वार रोखणाऱ्या जीवाजी महालेंचा पुतळा असणे ही काळाची गरज असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मासाहेबांनी ज्यांच्या शौर्याचे कौतुक “होते जीवाजी म्हणून वाचले शिवाजी” अशा शब्दांत केले, त्या महान योद्ध्याचा इतिहास येणाऱ्या पिढीला प्रेरणा देणारा ठरेल, असा विश्वास संघटनेने व्यक्त केला असून सिंदखेडराजा शहराच्या सुरू असलेल्या विकास आराखड्यांतर्गत वीर जीवाजी महाले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देऊन त्यासाठी निधीची तरतूद करावी, स्वराज्याच्या निर्मितीत सर्व जाती-धर्माच्या मावळ्यांचे योगदान आहे. जीवाजी महालेंच्या शौर्याचा आणि स्वामिनिष्ठेचा गौरव व्हावा, अशी मागणी देखील राष्ट्रीय नाभिक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष हरिदास जाधव, जिल्हा मुख्य सचिव डॉ. प्रकाश सवडतकर, तालुकाध्यक्ष विलास चित्रे, शहराध्यक्ष प्रदीप जाधव, तालुका उपाध्यक्ष शिवाजी जाधव, विजय बोबडे, शिवानंद वैद्य, गजानन राऊत, विष्णू वैद्य, राम राऊत, रामेश्वर जाधव आणि समस्त नाभिक समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.

