ठाण्यात ‘प्रहार’चे शक्तिप्रदर्शन
ठाणे,(प्रतिनिधी) : महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या आक्रमक शैलीने आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लढा देणाऱ्या प्रहार जनशक्ती पक्षाची एक अत्यंत महत्त्वाची आढावा बैठक ठाणे येथे पार पडली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि राज्यातील बदलती राजकीय समीकरणे लक्षात घेता, ठाणे जिल्ह्यात पक्षाची पाळेमुळे अधिक घट्ट करण्यासाठी ही बैठक महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

पक्षाचे कार्याध्यक्ष बल्लूभाऊ जावंजाळ आणि आंदोलन प्रमुख महेश बडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडली. बैठकीला संबोधित करताना बल्लूभाऊ जावंजाळ म्हणाले की, “प्रहार” हा केवळ राजकीय पक्ष नसून तो वंचितांचा आवाज आहे. ठाणे सारख्या शहरात जिथे नागरी समस्यांचे डोंगर उभे आहेत, तिथे प्रहारच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाला जाब विचारण्याची वेळ आली आहे. तर, आंदोलन प्रमुख महेश बडे यांनी कार्यकर्त्यांमध्ये जोश भरताना सांगितले की, प्रहारची ताकद ही आंदोलनांमध्ये आहे. जिथे अन्याय होईल, तिथे प्रहारचा कार्यकर्ता उभा असेल, हा विश्वास आपल्याला जनतेत निर्माण करायचा आहे.
बैठकीच्या सुरुवातीला ठाणे जिल्ह्यातील पक्षाच्या सध्याच्या स्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. गाव तिथे प्रहार, घर तिथे कार्यकर्ता निर्माण करून आगामी काळात ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक वॉर्ड आणि गावात पक्षाची शाखा उघडण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले. पाणी, रस्ते, आरोग्य आणि बेरोजगारी यांसारख्या मुद्द्यांवर आगामी काळात जिल्हाधिकारी कार्यालय आणि महापालिका प्रशासनावर धडक मोर्चा काढण्याचे संकेतही बैठकीत देण्यात आले. सोबतच पक्षाची सदस्य संख्या वाढवण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यावर भर देण्यात आला.
या बैठकीला मुंबई संपर्क प्रमुख ॲड.अजय तापकीर, पक्ष प्रवक्ते ॲड. मनोज टेकाडे, ठाणे जिल्हा अध्यक्ष स्वप्नील पाटील, आणि जिल्हा उपाध्यक्ष सुनील शिरीषकर यांनी आपली मते मांडली. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीने बैठकीत मोठे उत्साहाचे वातावरण होते. यावेळी स्वप्नील पाटील यांनी ठाणे जिल्ह्याचा अहवाल सादर करताना जिल्ह्यात प्रहारकडे लोकांचा ओढा वाढत आहे. तरुणांना प्रहारची कार्यपद्धती भावत असून, येणाऱ्या काळात ठाण्यात पक्ष मोठी झेप घेईल, असा विश्वास व्यक्त केला.
बैठकीचा मुख्य केंद्रबिंदू हा आगामी राजकीय वाटचाल होता. निवडणुका कधीही लागल्या तरी प्रहार जनशक्ती पक्ष पूर्ण ताकदीने उतरणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. केवळ निवडणुका जिंकणे हे ध्येय नसून, शेवटच्या माणसाला न्याय मिळवून देणे हा पक्षाचा मुख्य अजेंडा असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगत, प्रहार म्हणजे केवळ घोषणाबाजी नाही, तर कृतीतून दिलेला लढा आहे. ठाण्यातील प्रत्येक पीडित व्यक्तीला जेव्हा आधार हवा असेल, तेव्हा तिथे प्रहारचा झेंडा दिसेल,” असा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला.

