खळबळजनक: मलकापुरातून २० वर्षीय तरुणी बेपत्ता
अजय टप
मलकापूर (प्रतिनिधी): मलकापूर शहरात पुन्हा एकदा खळबळजनक घटना समोर आली असून तहसील चौक परिसरातून एक २० वर्षीय तरुणी संशयास्पद रित्या बेपत्ता झाली आहे. याप्रकरणी मलकापूर शहर पोलिसांत मिसिंग दाखल करण्यात आली असून महिला व मुली बेपत्ता होण्याच्या घटना थांबता थांबत नसल्याचे चित्र आहे. सोबतच भरवस्तीतून तरुणी बेपत्ता झाल्याने परिसरात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
शिरसोळी (ता. नांदुरा) येथील रहिवासी सुनिता पांडुरंग फरपट यांची मुलगी भाग्यश्री उर्फ आरती पांडुरंग फरपट (वय २० वर्षे) ही ७ मार्च २०२६ रोजी संध्याकाळी ५.३० वाजेच्या सुमारास मलकापूर येथील तहसील चौक परिसरात आली होती. मात्र, त्यानंतर ती कोणालाही काहीही न सांगता अचानक कोठेतरी निघून गेली. सायंकाळपासून रात्रीपर्यंत पालकांनी तिचा नातेवाईकांकडे आणि आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला, मात्र तिचा कुठेही सुगावा लागला नाही.
या प्रकरणी सुनिता पांडुरंग फरपट यांनी मलकापूर शहर पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी मिसिंग दाखल केली आहे. भाग्यश्री उर्फ आरती पांडुरंग फरपट हिचा रंग निमगोरा, उंची ५ फूट ३ इंच, बांधा सडपातळ असून तिने कथिया रंगाची साडी आणि ब्लाउज परिधान केलेले आहे. तसेच हातात गुलाबी बांगड्या, गळ्यात सोन्याची गहू पोत, बोटात अंगठी, कानात सोन्याचे डूल आणि पायात चांदीचे जोडवे. सोबत गुलाबी रंगाचा फुलांचा रुमाल आणि काळ्या रंगाची पर्स आहे. उपरोक्त वर्णनाच्या तरुणीबाबत माहिती मिळाल्यास मलकापूर पोलिसांशी संपर्क साधावा,असे आवाहन पोलीस अंमलदार शरद मुंढे यांनी केले आहे.

