स्मार्ट बुलढाणा

देऊळगाव राजाचे निसर्ग वैभव आगीच्या विळख्यात

देऊळगाव राजा,(प्रतिनिधी) : शहराचे फुफ्फुस मानल्या जाणाऱ्या आणि निसर्ग सौंदर्याने नटलेल्या महादेव खोरा परिसरातील वनराईला अज्ञात विकृत मानसिकतेच्या व्यक्तींनी आग लावून नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जाफराबाद बायपास रोड लगत सामाजिक वनीकरण विभाग आणि नगरपालिका प्रशासनाच्या प्रयत्नातून उभी राहिलेली ही हिरवीगार वनराई सध्या आगीच्या विळख्यात सापडली आहे.

जाफराबाद बायपास लगत असलेल्या या वनक्षेत्राला रविवारी अचानक आग लागली. ही आग नैसर्गिक नसून कुणीतरी जाणीवपूर्वक लावल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आगीने रौद्र रूप धारण केल्यामुळे परिसरातील जैवविविधता आणि शेकडो झाडे धोक्यात आली आहेत. घटनेची माहिती मिळताच ‘धरती बचाओ मिशन’ आणि ‘ग्लोबल इंडिया फेडरेशन’च्या सदस्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. वनश्री जनाबापू द्वारका नामदेव मेहेत्रे आणि दुर्गेश बनकर यांच्यासह त्यांचे सहकारी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. नगर परिषदेचे मुख्याधिकारी मोकळ, शिंपणे यांनीही आग विझवण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित केली आहे.

यापूर्वीही या वनराईला आग लावून ती नष्ट करण्याचा प्रयत्न झाला होता. पुन्हा तीच पुनरावृत्ती होणे ही मोठी शोकांतिका आहे. निसर्ग हे आपले वैभव आहे आणि ते टिकवणे ही केवळ प्रशासनाचीच नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. या संकटकाळात जास्तीत जास्त नागरिकांनी मदतीसाठी पुढे यावे आणि आपल्या स्तरावर हे निसर्ग वैभव वाचवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन निसर्गप्रेमींकडून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *