स्मार्ट बुलढाणा

मलकापूर नगरपालिकेत ‘लाकूडचोरी’चा प्रताप? 

अजय टप

मलकापूर (प्रतिनिधी): विदर्भाचे प्रवेशद्वार असलेल्या मलकापूर शहरात सध्या नगरपालिकेच्या ‘अजब-गजब’ कारभाराची जोरदार चर्चा रंगली आहे. शहराच्या विकासाची जबाबदारी असलेल्या नगरपालिकेतून चक्क शासकीय मालमत्तेची विल्हेवाट लावली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आज दुपारी पाणीपुरवठा विभागातून एका ‘छोटा हत्ती’ वाहनाद्वारे झाडांची लाकडे बाहेर नेण्यात आली, ज्यावरून शहरात संताप व्यक्त केला जात आहे.

नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या आवारातून आज काही वेळापूर्वी एका मालवाहू वाहनातून (छोटा हत्ती) झाडांचे ओंडके आणि लाकूड भरून ते अज्ञातस्थळी नेण्यात आले. हे लाकूड नेमके कोणाच्या आदेशाने आणि कुठे नेण्यात आले? हा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे, हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असल्याची खात्रीलायक माहिती आहे. या संपूर्ण प्रकारामागे नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांचा वरदहस्त असल्याचा थेट आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. “वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाशिवाय पालिकेच्या आवारातून एक पानही हलणे शक्य नाही, मग लाकडाने भरलेली गाडी गेलीच कशी?” असा सवाल आता सामान्य जनता विचारत आहे.

कोणाच्या आदेशाने लाकूड बाहेर नेले?, या लाकडाची विक्री करून पैसे कोणाच्या खिशात गेले?, सीसीटीव्ही फुटेजची चौकशी होऊन सत्य समोर येणार का?, असे एक ना अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत असून नगरपालिकेच्या कारभारावर पुन्हा एकदा संशयाचे मळभ दाटले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी शहरवासीयांनी केली आहे. आता यावर नगरपालिका प्रशासन काय अधिकृत स्पष्टीकरण देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शासकीय मालमत्तेची लूट!

नगरपालिकेच्या मालकीची झाडे किंवा लाकूड विकायचे असल्यास किंवा बाहेर न्यायचे असल्यास त्याची एक रीतसर प्रक्रिया असते, लिलाव करावा लागतो. मात्र, येथे कोणत्याही नियमांचे पालन न करता छुप्या पद्धतीने ही लाकडे लंपास करण्यात आल्याचे दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *