मलकापूर हादरले: ज्ञानेश्वर नगरमधील ४० वर्षीय तरुणाची जीवनयात्रा संपली
अजय टप
मलकापूर (प्रतिनिधी): एकीकडे सण-उत्सवाचे वारे वाहत असताना आणि दैनंदिन जीवनाची धावपळ सुरू असतानाच, मलकापूर शहरातून एक अत्यंत सुन्न करणारी घटना समोर आली. शहरातील ज्ञानेश्वर नगर भागातील रहिवासी वीरेंद्र रमेश कासे (वय ४० वर्षे) यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेमुळे कासे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
ज्ञानेश्वर नगर परिसरातील रहिवासी असलेले वीरेंद्र कासे यांनी आज ९ मार्च २०२६ रोजी सकाळी अज्ञात कारणावरून राहत्या घरात गळफास घेतला. ही बाब लक्षात येताच त्यांचे भाऊ विक्रम कासे यांनी क्षणाचाही विलंब न लावता त्यांना उपचारासाठी तातडीने मलकापूर येथील आयुष्यमान हॉस्पिटलमध्ये दाखल केले. आपल्या भावाचे प्राण वाचतील, या आशेने त्यांनी धावपळ केली; मात्र नशिबाला काही वेगळेच मान्य होते. हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी वीरेंद्र यांची तपासणी केली असता, उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली असल्याचे घोषित केले. ४० वर्षांचे वय हे आयुष्यातील उभारीचे वय असते. वीरेंद्र यांच्या जाण्याने ज्ञानेश्वर नगर परिसरातील नागरिकांनी शोक व्यक्त केला आहे. असा काय प्रसंग ओढवला की त्यांना हे टोकाचे पाऊल उचलावे लागले?, हा प्रश्न आता अनुत्तरीत आहे. संसाराचा गाडा हाकणारा कर्ता पुरुष असा अचानक निघून गेल्याने कासे कुटुंबाचा आधार हरपला आहे.
याप्रकरणी रुग्णालयातील कक्षसेवक अविनाश अरुण येरळीकर यांनी या घटनेची माहिती मलकापूर पोलिसांना दिली. आयुष्यमान हॉस्पिटलकडून प्राप्त मेमोच्या आधारे मलकापूर शहर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १९४ अन्वये मर्ग दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस अंमलदार सचिन पाटील हे करीत आहेत.

