स्मार्ट बुलढाणा

सैलानी: भक्ती, शक्ती आणि हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडवत पार पडला संदल

बुलढाणा,(प्रतिनिधी): संपूर्ण भारतात प्रसिद्ध असलेल्या हजरत हाजी अब्दुल रहमान ऊर्फ ‘सैलानी बाबा’ यांच्या वार्षिक यात्रेला होळीच्या पवित्र मुहूर्तावर मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे. यात्रेचा महत्वाचा टप्पा असलेला शाही संदल ८ मार्च रोजी रात्री ९ वाजता पिंपळगाव सराई येथील ऐतिहासिक ‘संदल खोली’तून वाजत-गाजत काढण्यात आला. लाखो भाविकांच्या उपस्थितीत निघालेला हा संदल रात्री ११.३० वाजता दर्ग्यावर पोहोचला. हा सोहळा पाहण्यासाठी अवघा देश सैलानीनगरीत एकवटल्याचे चित्र दिसून आले.

सैलानी बाबांचा इतिहास हा केवळ एका धार्मिक स्थळाचा इतिहास नसून तो सामाजिक सलोखा आणि मानवतेचा वारसा आहे. सुमारे १०० वर्षांपूर्वी हजरत सैलानी बाबा या भागात वास्तव्यास आले होते. असे मानले जाते की, बाबांनी आपल्या तपोबलाने आणि अध्यात्मिक शक्तीने लोकांच्या दु:खावर फुंकर घातली. विशेषतः मानसिक व्याधी, शारीरिक आजार आणि विविध बाधांनी त्रस्त असलेल्या भाविकांना येथे आल्यावर दिलासा मिळतो, अशी अढळ श्रद्धा आहे. या यात्रेची सुरुवात दरवर्षी होळीच्या दिवशी झाली. होळीच्या दिवशी हजारो नारळांची होळी पेटवून हजारो भाविकांनी होळी भोवती ‘सैलानी बाबा की जय’ असा जयघोष करत प्रदक्षिणा घातल्या आणि यात्रेला जल्लोषात सुरुवात झाली.

यात्रेचा सर्वोच्च बिंदू असलेला ‘शाही संदल’ अर्थात बाबांच्या दर्ग्यावर अर्पण केल्या जाणाऱ्या फुलांच्या चादरी आणि सुगंधी द्रव्यांचा तो ताफा उंटणीच्या पाठीवर ठेऊन रात्री ९ वाजता दरम्यान पिंपळगाव सराई येथील मूळ संदल खोलीतून काढण्यात आला. वाजत गाजत संदल मार्गाने हा संदल रात्री ११.३० वाजता दरम्यान सैलानी बाबांच्या मुख्य दर्ग्यावर पोहोचला. त्यानंतर मुजावरांच्या हस्ते अत्यंत भावूक वातावरणात आणि धार्मिक विधींनुसार सदर चादर दर्ग्यावर येऊन यात्रेचा धार्मिक मुख्य कार्यक्रम उत्साहात पार पडला.

सात लाख यात्रेकरूंचा महासागर

यंदा सैलानी बाबा यात्रेसाठी भाविकांचा प्रचंड ओघ पहावयास मिळाला. प्रशासकीय अंदाजानुसार, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि गुजरात या राज्यांतून जवळपास ५ ते ७ लाख भाविक यात्रेत दाखल झाले आहेत. चिखली-बुलढाणा मार्ग आणि सैलानी परिसरातील सर्व रस्ते भाविकांनी फुलून गेले आहेत. ठिकठिकाणी भाविकांनी आपली तात्पुरती पाल (तंबू) ठोकली असून, संपूर्ण परिसर एका मिनी शहरात रूपांतरित झाला आहे.

प्रशासकीय नियोजन आणि सुरक्षा व्यवस्था

लाखो भाविकांची गर्दी लक्षात घेता जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागाने सूक्ष्म नियोजन करण्यात आले. पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे १ हजार ५०० हून अधिक पोलीस कर्मचारी, राज्य राखीव दलाच्या तुकड्या आणि गृहरक्षक दलाचे जवान यात्रेत तैनात करण्यात आले असून संदल मार्गावर आणि दर्गा परिसरात गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष वॉच टॉवर उभारण्यात आले आहेत. सोबतच संपूर्ण यात्रा परिसर १०० हून अधिक हाय-डेफिनिशन सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली असल्याचे दिसून आले. जिल्हा आरोग्य विभागाने १० पेक्षा जास्त तात्पुरती आरोग्य केंद्रे उभारली. तसेच २४ तास रुग्णवाहिकांची उपलब्धता ठेवण्यात आली. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याचे टँकर्स आणि फिरती शौचालये ठेवण्यात आली. भाविकांच्या सोयीसाठी राज्य परिवहन मंडळाने विविध आगारांतून जवळपास २०० हून अधिक जादा बसगाड्या सोडल्या आहेत.

सामाजिक सलोख्याचे घडले दर्शन

सैलानी बाबांच्या यात्रेत हिंदू आणि मुस्लिम बांधव खांद्याला खांदा लावून सहभागी झाले. हा सोहळा भारतीय संस्कृतीतील ‘विविधतेत एकता’ या मूल्याचे जिवंत उदाहरण ठरला. संदल मार्गावर अनेक ठिकाणी स्थानिक नागरिकांकडून पाणी आणि महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. हा शाही संदल केवळ एक धार्मिक सोहळा न ठरता लाखो भाविकांच्या विश्वासाचा उत्सव ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *