स्मार्ट बुलढाणा

राज्य महिला आयोगाचा मानाचा ‘महिला गौरव पुरस्कार’ अ‍ॅड. वर्षा पालकर यांना प्रदान

बुलढाणा,(प्रतिनिधी): महाराष्ट्र शासन आणि राज्य महिला आयोगाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय सोहळ्यात बुलढाण्याच्या सुपुत्री अ‍ॅड. वर्षा पालकर यांना मानाच्या ‘महिला गौरव पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. सामाजिक क्षेत्रात त्यांनी दिलेल्या अतुलनीय योगदानाची दखल घेऊन राज्य सरकारने हा गौरव केला आहे.
मुंबई येथील रविंद्र नाट्य मंदिर येथे पार पडलेल्या या दिमाखदार सोहळ्यात राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या हस्ते अ‍ॅड. पालकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्यातील ३० जिल्ह्यांमधून महिला व बालकांसाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या निवडक कर्तृत्ववान महिलांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. अ‍ॅड. वर्षा पालकर यांनी प्रदीर्घ काळापासून सामाजिक आणि महिलांच्या न्याय्य हक्कासाठी केलेल्या कार्याचा गौरव यावेळी मान्यवरांनी केला.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर अ‍ॅड. वर्षा पालकर यांनी “स्त्री ही केवळ नाती जोडणारी नसते, तर ती समाज घडवणारी असते. महिला आयोगाचा हा सन्मान स्वीकारताना मला अभिमान वाटत आहे. महाविद्यालयीन जीवनापासून असलेली समाजकार्याची आवड आणि लग्नानंतर सासरच्या सुशिक्षित कुटुंबाकडून मिळालेले प्रोत्साहन यामुळेच मी आज इथपर्यंत पोहोचू शकले.”, आशा भावना व्यक्त केल्या. या प्रवासात जिल्हा न्यायालय, विधी सेवा प्राधिकरण, महिला बालविकास अधिकारी, बाल कल्याण समिती, बाल न्याय मंडळ, बाल संरक्षण अधिकारी आणि बालगृह अधीक्षक या सर्वांच्या सहकार्यामुळेच महिला व बालकांसाठी ठोस काम करता आले, असेही त्यांनी यावेळी बोलतांना नमूद केले.
जिल्ह्यातून कौतुकाचा वर्षाव
अ‍ॅड. वर्षा पालकर यांना राज्यस्तरावरील हा मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल बुलढाणा जिल्ह्यासह महाराष्ट्रातील विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या यशामुळे सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये एक नवी ऊर्जा निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *