सीसीटीएनएस प्रणालीत बुलढाणा महाराष्ट्रात प्रथम
बुलढाणा,(प्रतिनिधी) : राज्यातील गुन्हेगारी नियंत्रण आणि पोलीस दलाच्या कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या सीसीटीएनएस प्रणालीमध्ये बुलढाणा जिल्हा पोलीस दलाने ऐतिहासिक कामगिरी बजावली. डिसेंबर २०२५ च्या मानांकनात बुलढाणा जिल्ह्याने २०१ पैकी २०१ गुण मिळवत महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या यशात पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक तथा नोडल अधिकारी अमोल गायकवाड यांच्या कुशल नेतृत्वाचा आणि तांत्रिक नियोजनाचा मोलाचा वाटा असल्याचे अधोरेखित झाले आहे.
कोणत्याही प्रणालीची अंमलबजावणी करताना केवळ तांत्रिक ज्ञान असून चालत नाही, तर त्यासाठी लागणारी प्रशासकीय पकड आणि दूरदृष्टी महत्त्वाची असते. बुलढाणा जिल्ह्याला राज्याच्या शिखरावर नेऊन ठेवण्यात अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांनी ‘गेम चेंजर’ म्हणून भूमिका बजावली आहे. सीसीटीएनएस प्रणालीचे नोडल अधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारल्यापासून त्यांनी जिल्ह्यातील ३४ पोलीस स्टेशनच्या कामकाजावर सूक्ष्म लक्ष केंद्रित केले. ऑनलाइन फॉर्म फीडिंग असो वा ‘सक्सेस स्टोरीज’ची नोंद, प्रत्येक टप्प्यावर त्यांनी स्वतः पाठपुरावा केला. त्यांच्या ‘स्मार्ट मॉनिटरिंग’ मुळेच आज बुलढाणा पोलीस दलाने १०० टक्के गुण मिळवण्याचा करिष्मा करून दाखवला. पोलीस दलातील गुंतागुंतीच्या प्रक्रियेला सुटसुटीत करून, अंमलदारांना प्रोत्साहन देत त्यांनी ही यंत्रणा कार्यान्वित केल्याने याचा परिणाम आज निकालातून दिसत आहे.
सीसीटीएनएस प्रणाली आणि जिल्ह्याची कामगिरी?
सीसीटीएनएस हा केंद्र सरकारचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून तो नॅशनल प्राईम ब्युरो रेकॉर्ड, नवी दिल्ली यांच्यामार्फत राबविला जातो. महाराष्ट्रात गुन्हे अन्वेषण विभाग (पुणे) या मानांकनावर शिक्कामोर्तब करते. डिसेंबर २०२५ च्या मूल्यमापनात जिल्ह्याने २०१ पैकी २०१ गुण मिळवले. गेल्या ६ महिन्यांपासून बुलढाणा जिल्हा सातत्याने पहिल्या पाच क्रमांकांमध्ये आपले स्थान टिकवून असून एफआयआर प्रसिद्ध करणे, ITSSO मधील यश, Crimac FIR ट्रान्सफर, आणि CDR विश्लेषण या सर्व निकषांवर जिल्हा अव्वल ठरला आहे.
टीम वर्क आणि ‘कमांड’चा विजय
पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेला वेग आला. मात्र, जमिनीवर या आदेशांची अंमलबजावणी प्रभावीपणे करून घेण्याची जबाबदारी अमोल गायकवाड यांनी लीलया पेलली. त्यांच्या सोबतीला सीसीटीएमएसचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पाटील, पोलीस अंमलदार सुनील वाघमारे, किरण चिंचोले,महिला पोलीस अंमलदार दिपामाला पुरंदरे, कविता पाडळे, प्रतिभा इंगळे, नगमा शेख, पोलीस अंमलदार संतोष कायंदे, महिला पोलीस अंमलदार दिपाली खर्चे, मनीषा चोरघडे या संपूर्ण टीमने अहोरात्र मेहनत घेतली, हे विशेष!
डिजिटल युगात बुलढाणा पोलीस ‘हायटेक’
अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे आता जिल्ह्यातील गुन्ह्यांची माहिती, तपासाची प्रगती आणि गुन्हेगारांचा डेटा अवघ्या काही सेकंदात उपलब्ध होत आहे. ही केवळ एक रँकिंग नसून, सामान्य नागरिकांना जलद न्याय मिळवून देण्यासाठी टाकलेले एक मोठे पाऊल आहे. अमोल गायकवाड यांच्या या ‘रिझल्ट ओरिएंटेड’ कामाचे संपूर्ण महसूल आणि पोलीस विभागात कौतुक होत असून, त्यांच्या नियोजनाचे मॉडेल आता इतर जिल्ह्यांसाठीही आदर्श ठरत आहे.

