खळबळजनक! बुलढाणा जिल्ह्यात एकाच दिवसात ६ तरुण मुली बेपत्ता
अजय टप
मलकापूर,(प्रतिनिधी) : जिल्ह्यात एकाच दिवसात म्हणजे ९ मार्च २०२६ रोजी सहा तरुण मुली बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून, या घटनांमुळे संपूर्ण जिल्हा हादरला आहे. विशेष म्हणजे बेपत्ता झालेल्यांमध्ये १२ वीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थिनींपासून ते फार्मसीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणींचा समावेश आहे. जळगाव जामोद, संग्रामपूर, नांदुरा, खामगाव आणि बुलढाणा शहर अशा पाच वेगवेगळ्या पोलीस स्टेशन अंतर्गत या तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
पहिली घटना जळगाव जामोद तालुक्यातील वडशिंगी येथे घडली. रेणुका ज्ञानेश्वर मिरगे (१७ वर्ष ५ महिने) ही विद्यार्थिनी ९ मार्च रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास ‘१२ वीचा पेपर द्यायला जाते’ असे सांगून घरातून निघाली. मात्र, ती परीक्षा केंद्रावर पोहोचलीच नाही. नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला असता ती मिळून आली नाही. या प्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १३७(२) अन्वये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेपत्ता मुलीचा रंग गोरा, उंची ५ फूट ६ इंच असून तिने अंगात ‘द न्यू ईरा हायस्कूल’चा गणवेश परिधान केलेला आहे.
संग्रामपूर तालुक्यातील तामगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या संग्रामपूर येथून वैष्णवी नारायण तायडे (वय २१ वर्षे) ही तरुणी ९ मार्चच्या मध्यरात्री बेपत्ता झाली. तिचे काका शांताराम तायडे यांनी तामगाव पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरुण पोलिसांनी मिसिंग दाखल केली आहे. वैष्णवीचा रंग गोरा, उंची ५ फूट २ इंच असून तिने अंगात काळ्या रंगाचा टॉप आणि लाल रंगाची लेगी घातलेली आहे.
नांदुरा तहसील कार्यालयाजवळून प्रतिभा अनिल डाबेराव (वय १८ वर्ष ४ महिने) ही तरुणी बेपत्ता झाली आहे. ती ९ मार्च रोजी सकाळी ११.३० वाजता आपल्या सासऱ्यांना ‘ब्युटी पार्लरमध्ये जाते’ असे सांगून निघाली होती. तेव्हापासून तिचा शोध लागलेला नाही. तिचा रंग गोरा, उंची ५ फूट उंची, मजबूत बांधा, घारे डोळे, अंगात फुलांचे चित्र असलेला हिरवट टॉप आणि काळी जीन्स घातलेली आहे.
खामगाव तालुक्यातील वर्णा येथील रहिवासी असलेली दिव्या संजय निबोळकर (वय १९ वर्षे) ही तरुणी १० मार्च रोजी सकाळी ११.३० च्या सुमारास बेपत्ता झाली. तिने शेजारील महिलेला ‘मी मामाच्या गावाला जाते’ असे सांगितले आणि ती घरून निघून गेली. सर्व नातेवाईकांकडे चौकशी केली असता तिचा शोध लागला नाही. तिचा रंग गोरा असून तिने अंगात गुलाबी रंगाचा पंजाबी ड्रेस घातलेला आहे.
बुलढाणा शहरातील मिलिंद नगर येथील समीक्षा कैलास मिसाळ ( वय१८ वर्षे) ही विद्यार्थिनी ९ मार्च रोजी दुपारी १ वाजता शिवाजी हायस्कूल येथे १२ वीचा पेपर देण्यासाठी गेली होती. दररोज ती संध्याकाळी ६.३० पर्यंत घरी येते, मात्र त्या दिवशी ती परतलीच नाही. तिचा रंग गोरा, उंची ५ फूट असून तिने अंगात मेंदी रंगाचा पंजाबी ड्रेस परिधान केलेला आहे. तर सहावी घटना अत्यंत धक्कादायक आहे. बुलढाणा तालुक्यातील येळगाव येथील शिवानी राजू कमळकर ( वय २० वर्षे) ही फार्मसीच्या दुसऱ्या वर्षात शिकणारी तरुणी ९ मार्च रोजी कॉलेजला गेली होती. ती घरी न परतल्याने शोधाशोध सुरू असताना रात्री ८ वाजेच्या सुमारास तिने वडिलांना फोन केला आणि “मी लग्न करते” असे सांगून फोन कट केला. त्यानंतर तिचा फोन बंद येत आहे. तिचा रंग गोरा, उंची ४.५ फूट असून तिने अंगात पांढरा टॉप आणि काळी लगीन घातलेली आहे.
एकाच दिवशी आणि जवळपास २४ तासांच्या कालावधीत जिल्ह्याच्या विविध भागांतून तरुण मुली बेपत्ता होण्याच्या घटनांमुळे आश्चर्य व्यक्त असून पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. बहुतांश घटनांमध्ये मुली अभ्यासाचे किंवा कामाचे कारण सांगून घराबाहेर पडल्या आहेत, हे विशेष! वरीलपैकी कोणत्याही वर्णनाची मुलगी आढळल्यास तातडीने संबंधित पोलीस स्टेशन सोबत संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील या वाढत्या घटनांमुळे सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पालकांनी आपल्या मुलांशी संवाद ठेवा आणि त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवावे, असे आवाहन ‘हिंदवार्ता’च्या वतीने करण्यात येत आहे.

