धमाका! संग्रामपूरच्या रणरागिणीचा देशपातळीवर गौरव!
संग्रामपूर,(प्रतिनिधी): एकीकडे ग्रामीण राजकारणात महिलांचा सहभाग केवळ नावापुरता असल्याची चर्चा होत असताना, बुलढाणा जिल्ह्याच्या संग्रामपूर तालुक्यातील एका महिला सरपंचाने थेट देशाची राजधानी गाजवली आहे. पिंप्री काथरगाव ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच सुवर्णाताई गणेशराव टापरे यांची ‘सशक्त पंचायत नेत्री अभियान’ अंतर्गत राष्ट्रीय सम्मेलनासाठी निवड झाली असून, संपूर्ण जिल्ह्यातून हा मान मिळवणाऱ्या त्या एकमेव सरपंच ठरल्या आहेत.
बुलढाणा जिल्हा परिषदेने अत्यंत चोखंदळपणे संपूर्ण जिल्ह्यातून केवळ सुवर्णाताई टापरे यांचीच या राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमासाठी निवड केली. दिल्लीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय परिषदेत ११ मार्च रोजी त्यांनी आपल्या गावाच्या विकासाची ‘यशोगाथा’ मांडली, तेव्हा उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे कौतुक केले. जिल्हा परिषदेच्या विश्वासाला तडा जाऊ न देता, सुवर्णाताईंनी दिल्लीच्या व्यासपीठावरून ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासाचे मॉडेल देशासमोर ठेवले. एका छोट्याशा तालुक्यातील सरपंचाने दिल्लीत जाऊन गावाचा आवाज बुलंद केल्याची बाब संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानास्पद ठरली आहे. या सोहळ्यात त्यांनी माझ्या गावाने माझ्यावर जो विश्वास टाकला आणि गावकऱ्यांनी जी साथ दिली, त्याच जोरावर मी इथपर्यंत पोहोचू शकले, अशा शब्दांत आपल्या यशाचे श्रेय ग्रामस्थांना दिले. आज पिंप्री काथरगावचा आवाज खऱ्या अर्थाने दिल्लीत घुमला असून, त्यांच्या या कामगिरीमुळे संपूर्ण संग्रामपूर तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे.
निधीची चणचण, पण विकासाची जिद्द मोठी
सुवर्णाताईंचा हा प्रवास सोपा नव्हता. अनेकदा वित्त आयोगाचा निधी वेळेवर उपलब्ध नसतानाही त्यांनी विकासाची चाके थांबून दिली नाहीत. ग्रामस्थांना सोबत घेऊन त्यांनी गावात शिक्षण, आरोग्य आणि स्वच्छतेचे जे जाळे विणले, त्याचीच दखल आज राष्ट्रीय स्तरावर घेतली गेली आहे. त्यांच्या कार्यकाळात पिंप्री काथरगावने कात टाकली असून, आज हे गाव एक ‘मॉडेल व्हिलेज’ होण्याकडे वाटचाल करत आहे.
ग्रामपंचायतीचा नवा आदर्श
केवळ रस्ते आणि नाल्यांचे बांधकाम म्हणजे विकास नव्हे, तर समाजातील शेवटच्या घटकाचा विकास म्हणजे खरी प्रगती, हा विचार सुवर्णाताईंनी कृतीतून उतरवला. त्यांनी स्वच्छतेला प्राधान्य देऊन गाव हागणदारीमुक्त केले. गावात दारूबंदी आणि व्यसनमुक्तीसाठी कडक पावले उचलली. अंगणवाड्या आणि शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी विशेष प्रयत्न केले. तसेच महिला स्नेही आणि बालस्नेही वातावरण निर्माण करून ग्रामीण महिलांना सन्मानाने जगण्याची उमेद दिली.

