क्राईम जगत

पातुर्डा शिक्षिका हत्याकांड: संग्रामपूर वकील संघ आक्रमक; सीआयडी चौकशीची मागणी!

संग्रामपूर,(प्रतिनिधी): तालुक्यातील पातुर्डा येथील शिक्षिका वृषाली प्रकाश गावंडे यांच्या निर्दयी हत्येच्या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. अपघाताचा बनाव रचून घडवून आणलेला हा थरारक खून म्हणजे मानवतेला काळिमा फासणारी घटना असून, या प्रकरणाची उच्चस्तरीय पोलीस अधिकारी आणि सीआयडी मार्फत सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी संग्रामपूर वकील संघाने केली आहे.

महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री यांना तहसीलदारांमार्फत पाठवण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे की, जळगाव जामोद पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पेसोडा फाट्याजवळ घडलेली ही घटना सुरुवातीला अपघात वाटत होती. मात्र, पोलिसांनी तपासचक्र फिरवून यामागील निर्दयी खुनाचा कट उघडकीस आणला. या प्रकरणात मृत शिक्षिकेचा पती आणि त्याच्या साथीदाराने संगनमताने हा कट रचल्याचे निष्पन्न झाले आहे. सध्या तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात असले, तरी यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे निवेदनात नमूद असून गुन्ह्यात रचलेला फौजदारी कट पाहता, यामध्ये अजूनही काही आरोपी असण्याची शक्यता आहे, त्यांचा शोध घ्यावा, स्थानिक पोलिसांऐवजी सीआयडीमार्फत तपास करण्यात यावा, अशा क्रूर गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी देखील संग्रामपूर दिवाणी व फौजदारी न्यायालय वकील संघाचे ज्येष्ठ विधीज्ञ ॲड.नितीन जी, ॲड.एस.टी.कुरवाळे,ॲड.जी.ए.क्षीरसागर,ॲड.आर.एस.राऊत,ॲड.पी.के.तायडे, ॲड.वानखडे, ॲड.के.पी.बावस्कार, ॲड.एम.एस.कीर्तने, ॲड.ए.एस.धामोळे, ॲड.निवृत्ती वाघ,ॲड.एस.एस.गोतमारे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *