क्राईम जगत

बुलढाण्यात ‘सिनेस्टाईल’ थरार! हायवेवर पाठलाग करून धाड पोलिसांनी बकरी चोरांची कार पकडली

धाड,( प्रतिनिधी) : जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून शेतकरी आणि पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण करणाऱ्या बकरी चोरट्यांच्या टोळीचा धाड पोलिसांनी अत्यंत थरारक पद्धतीने पर्दाफाश केला. एखाद्या चित्रपटाला शोभेल असा पाठलाग करून पोलिसांनी हुंडाई कारमधून बकऱ्यांची तस्करी करणाऱ्या नाशिक आणि मुंबईच्या दोन सराईत चोरट्यांना आज ११ मार्च रोजी बेड्या ठोकल्या.

धाड (ता.बुलढाणा) येथील टिपू सुलतान चौकातून आज, ११ मार्च रोजी शेख सलीम यांची सुमारे १२ हजार रुपये किमतीची बकरी अज्ञात चोरट्यांनी एका हुंडाई कारमध्ये टाकून पळवून नेली. ही कार बुलढाणाच्या दिशेने सुसाट वेगाने जात असल्याची गुप्त माहिती धाड पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रताप भोस यांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी विलंब न लावता ऑपरेशन ‘चोर पकडो’ सुरू केले. ठाणेदार प्रताप भोस यांनी स्वतःच्या खाजगी वाहनाने, तर पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर केंद्रे आणि पोलीस अंमलदार कृष्णा चव्हाण, रवींद्र बराटे, राजू माळी आणि चालक नितीन इंगळे यांच्या पथकाने शासकीय वाहनाने चोरट्यांच्या गाडीचा पाठलाग सुरू केला. पोलिसांनी केवळ पाठलागच केला नाही, तर बुलढाणा येथील ‘दामिनी पथकाला’ तातडीने धाड रोडवर नाकाबंदी करण्याचे आदेश दिले. एकीकडून पोलीस मागे लागलेले असताना दुसरीकडे नाकाबंदीमुळे चोरटे कात्रीत सापडले. अखेर बुलढाणा येथील धाड नाक्यावर पोलिसांनी या संशयास्पद वाहनाला घेराव घालून यशस्वीरित्या अडवले. पोलिसांनी कारची झडती घेतली असता, अधिकारीही चक्रावून गेले. आलिशान कारचा वापर बकऱ्या चोरण्यासाठी केला जात असल्याचे समोर आले. या गाडीत एकूण ४ बकऱ्या आढळून आल्या. पोलिसांनी तात्काळ गाडीतील शेख फिरोज शेख लियाकत (वय ४५ वर्षे) रा. सादिक नगर, वडाळा (नाशिक) आणि आरिफ अब्दुल शेख (वय ३२ वर्षे) रा. माहीम झोपडपट्टी (मुंबई) यांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांनी आपला गुन्हा कबूल केला. यातील एक बकरी त्यांनी ‘धाड’ येथून चोरली, तर उर्वरित तीन बकऱ्या भोकरदन आणि सिल्लोड परिसरातून लंपास केल्याची कबुली पोलिसांना दिली. हे दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांनी यापूर्वीही धाड आणि परिसरात अनेक चोऱ्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

या प्रकरणी शेख सलीम यांच्या तक्रारीवरून धाड पोलिसांत भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ (२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या १५ दिवसांपूर्वी धाड येथून १० बकऱ्या चोरीला गेल्याची घटना घडली होती. आता या सराईत टोळीला अटक केल्यामुळे त्या मोठ्या चोरीचा छडा लागण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुढील तपास धाड पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *