२०२५ मध्ये हरवलेल्या ८७ टक्के महिलांचा पोलिसांनी घेतला शोध
बुलढाणा,(प्रतिनिधी): बुलढाणा जिल्हा पोलीस दलाने महिला सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या प्रभावी मोहिमेमुळे, वर्ष २०२५ मध्ये जिल्ह्यातून हरवलेल्या महिलांपैकी तब्बल ८७ टक्के महिलांचा यशस्वी शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. वाढत्या बेपत्ता प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची ही कामगिरी जिल्ह्यासाठी दिलासादायक ठरली आहे.
गेल्या काही काळापासून विविध कारणांमुळे महिला हरवण्याचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत होते. या समस्येचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात विशेष “महिला मिसिंग डेस्क” स्थापन करण्यात आला आहे. तसेच, जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशन स्तरावर “मिसिंग सेल” कार्यान्वित करण्यात आले आहेत. या दोन्ही विभागांमध्ये चोख समन्वय असल्याने माहितीची देवाणघेवाण जलद गतीने होते. तांत्रिक विश्लेषण, स्थानिक खबऱ्यांचे जाळे आणि सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून या पथकांनी बेपत्ता महिलांचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर केले आहे.
पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना महिलांच्या बेपत्ता होण्याच्या तक्रारीकडे तातडीने लक्ष देऊन पहिल्या २४ तासांत तपासाची चक्रे फिरवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. नियंत्रण कक्षातून या सर्व प्रकरणांचे दररोज मॉनिटरिंग केले जात आहे. महिलांची सुरक्षा आणि बेपत्ता प्रकरणांचा शोध ही आमची प्राथमिकता आहे. ८७ टक्के महिलांचा शोध घेणे हा एक टप्पा असून, प्रलंबित २८४ प्रकरणांतील महिलांनाही लवकरात लवकर शोधून काढण्यासाठी आमचे ‘मिसिंग सेल’ रात्रंदिवस काम करत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक तांबे यांनी दिली आहे. सोबतच केवळ पोलीस यंत्रणाच नव्हे, तर समाजानेही याबाबत सजग राहणे गरजेचे आहे. एखादी महिला किंवा मुलगी बेपत्ता झाल्यास तातडीने जवळच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
काय सांगते आकडेवारी?
जिल्हा पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, २०२५ या एकाच वर्षात नोंद झालेल्या एकूण प्रकरणांपैकी ८७ टक्के प्रकरणांचा निपटारा झाला आहे. कौटुंबिक वाद, वैयक्तिक अडीअडचणी किंवा इतर कारणांमुळे घर सोडून गेलेल्या महिलांना शोधून त्यांना त्यांच्या कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. सद्यस्थितीत, सन २०२१ पासून आजपर्यंतची एकूण २८४ प्रलंबित प्रकरणे असून, या महिलांचा शोध घेण्यासाठी देखील पोलीस दल सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. प्रलंबित प्रकरणांमधील गुंतागुंत लक्षात घेऊन विशेष तपास पथके देखील कार्यरत आहेत.

