क्राईम जगत

आयपीएस नीलेश तांबेंचा ‘थर्ड आय’ अ‍ॅक्टिव्ह!

बुलढाणा,( प्रतिनिधी): पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांनी दिलेल्या ‘फ्री हॅण्ड’नंतर स्थानिक गुन्हे शाखेने जिल्ह्यात अक्षरशः वादळ निर्माण केले आहे. वरली मटका आणि अवैध दारू विक्रीच्या अड्ड्यांवर धाडी टाकून पोलिसांनी गुन्हेगारांचे कंबरडे मोडले असून, एकाच दिवसात १० आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या धडक मोहिमेत तब्बल २८ हजार ८२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, “गुन्हेगारांनो सावधान, आता तुमची खैर नाही,” असा स्पष्ट इशाराच पोलिसांनी दिला आहे. त्यामुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे आता धाबे दणाणले आहेत.

बुलढाणा जिल्ह्यात अवैध हातभट्टी, देशी-विदेशी दारू आणि वरली मटका यांसारख्या समाजघातक धंद्यांनी डोके वर काढले होते. यावर कायमचा लगाम घालण्यासाठी पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांनी कडक पावले उचलण्याचे आदेश दिले होते. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांनी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात स्वतंत्र पथके रवाना केली. एलसीबीच्या पथकाने जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीत छापेमारी करून जुगारींना पळताभुई थोडी केली.

पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा आणि अमोल गायकवाड (बुलढाणा) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वात सपोनि यशोदा कनस, पोउपनि पंकज सपकाळे, पोलीस अंमलदार ओमप्रकाश सावळे, राजेंद्र अंभोरे, गजानन भुजबळ, महिला पोलीस अंमलदार वनिता शिंगणे यांनी धामणगाव बढे पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या पिंपळगाव देवी येथे वरली मटका खेळणाऱ्या आकाश कुवरसिंग राजपूत (वय ३१ वर्षे) याला अटक करून २ हजार ९२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. बोराखेडी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या फुली येथे रामदास जगदेव बोडदे (वय ५५ वर्षे) आणि शेंबा बुद्रुक येथे जोतीराम तोताराम दाभाडे (वय ६८ वर्षे) या वृद्ध जुगारींवर कारवाई करत रोख रक्कम हस्तगत केली. शेगाव शहरात भरवस्तीत चालणाऱ्या जुगारावर पोलिसांनी झडप घातली. यात पुंजाजी शालीग्राम खंडागळे आणि राजाराम सखाराम तायडे या दोघांना अटक करून त्यांच्याकडून रोख रकमेसह महागडे मोबाईल जप्त करण्यात आले. तामगाव पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कवटळ येथील देवानंद मुरलीधर पाखरे आणि संग्रामपूर बसस्थानक परिसरातील सुदामा उर्फ राजू गोविंदराव वानखेडे याला रंगेहात पकडून जुगाराचे साहित्य जप्त केले.

दारूमाफियांचे धाबे दणाणले!

केवळ जुगारच नव्हे, तर अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरुद्धही पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. डोणगाव पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या घाटबोरी येथे अवैध हातभट्टी चालवणाऱ्या सिद्धार्थ सीताराम मोरे (वय ६० वर्षे) याच्यावर कारवाई करत २० लिटर हातभट्टीची दारू आणि साहित्य जप्त केले. नांदुरा पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या अलमपूर येथील विठ्ठल भानुदास बगाडे आणि निमगाव येथील आशिष शंकर इंगळे यांना पकडून त्यांच्याकडून ५० हून अधिक देशी-विदेशी दारूच्या शिशा हस्तगत केल्या आहेत. या संपूर्ण कारवाईत पोलिसांनी एकूण २८ हजार ८२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये रोख रक्कम, मोबाईल फोन आणि दारूच्या साठ्याचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *