नाशिक-मुंबईच्या सराईत चोरट्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी
धाड, (प्रतिनिधी): धाड परिसरातून आलिशान कारमधून बकऱ्यांची चोरी करणाऱ्या नाशिक आणि मुंबईच्या दोन सराईत गुन्हेगारांना आज, १२ मार्च रोजी बुलढाणा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोन्ही आरोपींना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. हायवेवर थरारक पाठलाग करून धाड पोलिसांनी या टोळीला बेड्या ठोकल्या होत्या.
धाड येथील टिपू सुलतान चौकातून ११ मार्च रोजी शेख सलीम यांची बकरी चोरून चोरटे हुंडाई कारमधून पळ काढत होते. धाड पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रताप भोस आणि त्यांच्या पथकाने खासगी व शासकीय वाहनांनी या कारचा पाठलाग केला. दुसरीकडे बुलढाणा रोडवर नाकाबंदी करण्यात आली होती. या ‘चक्रव्यूहात’ अडकलेल्या चोरट्यांना पोलिसांनी धाड नाक्यावर झडप घालून पकडले.
आरोपींची ओळख आणि कबुली
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये शेख फिरोज शेख लियाकत (४५, रा. वडाळा, नाशिक) आणि आरिफ अब्दुल शेख (३२, रा. माहीम, मुंबई) यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून चोरीच्या ४ बकऱ्या आणि गुन्ह्यात वापरलेली कार जप्त करण्यात आली आहे. प्राथमिक चौकशीत त्यांनी धाडसह सिल्लोड आणि भोकरदन परिसरातूनही बकऱ्या चोरल्याची कबुली दिली आहे.
पोलीस कोठडीत होणार सखोल तपास
धाड परिसरात गेल्या १५ दिवसांपूर्वी १० बकऱ्या चोरीला गेल्याची मोठी घटना घडली होती. या चोरीचा धागादोरा या टोळीशी जोडलेला असण्याची दाट शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. आरोपींकडून जिल्ह्यातील इतर चोरीच्या घटनांची माहिती काढणे आणि या टोळीत अजून कोणाचा समावेश आहे का, याचा तपास पोलीस करत असून सोबतच ते या सराईत गुन्हेगारांकडून आणखी किती गुन्ह्यांची माहिती वदवून घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुढील तपास ठाणेदार प्रताप भोस यांच्या मार्गदर्शनाखाली धाड पोलीस करीत आहेत.

