स्मार्ट बुलढाणा

बुलढाणा पोलीस शिपाई भरती: १५ मार्च रोजी लेखी परीक्षा

बुलढाणा,(प्रतिनिधी): बुलढाणा जिल्हा पोलीस दलातील १८८ पोलीस शिपाई पदांसाठीची भरती प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. शारीरिक मोजमाप आणि मैदानी चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा रविवार, १५ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ ते १२.३० वाजता आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेबाबत जिल्हा पोलीस प्रशासनाने उमेदवारांसाठी कडक नियमावली आणि सूचना जाहीर केल्या आहेत.

लेखी परीक्षा सहकार विद्या मंदिर, चिखली रोड, बुलढाणा येथे पार पडणार आहे. उमेदवारांनी बायोमॅट्रिक पडताळणीसाठी परीक्षा सुरू होण्यापूर्वी किमान दोन तास आधी केंद्रावर हजर राहणे अनिवार्य आहे. उमेदवारांकडे मैदानी चाचणीचे प्रवेशपत्र आणि लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र अशी दोन्ही कागदपत्रे असणे आवश्यक आहे. त्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. प्रवेशपत्रावर नमूद केलेले दोन पासपोर्ट साईज फोटो सोबत ठेवावेत. लेखी परीक्षेसाठी लागणारे बॉल पेन आणि रायटिंग पॅड पोलीस प्रशासनाकडूनच पुरवले जाणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी पेन, पेन्सिल किंवा खोडरबर सोबत आणू नये. मोबाईल, स्मार्ट वॉच, डिजिटल डायरी, कॅल्क्युलेटर किंवा कॉपी करण्यासाठी वापरता येईल, असे कोणतेही इलेक्ट्रॉनिक साहित्य आणण्यास सक्त मनाई आहे. नियम मोडल्यास महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा अधिनियमान्वये कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. ही परीक्षा अत्यंत पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी जिल्हा पोलीस दलाची गोपनीय यंत्रणा सक्रिय राहणार आहे. उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *