क्राईम जगत

अहो “सिलेंडर्स”च नाही, तर टीबी हॉस्पिटलमधून लय काही चोरी गेल!

बुलढाणा (प्रतिनिधी): बुलढाणा शहरात गुन्हेगारांचे धाडस आता शिगेला पोहोचले आहे. चोरांनी चक्क जिल्हा क्षयरोग (टीबी) हॉस्पिटलला लक्ष करत, तेथील स्वयंपाकघर आणि स्टोअर रूममध्ये मोठी लूट केली आहे. देशभरात गॅस सिलेंडरचा तुटवडा असताना, चोरांनी इथून भरलेले सिलेंडर, २५ सीलिंग फॅन आणि रुग्णांच्या प्राणवायूसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली तांब्याची ऑक्सिजन पाईपलाईन देखील कापून नेली आहे. या धाडसी चोरीमुळे आरोग्य वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

४ मार्च २०२६ रोजी रात्री ७ वाजेच्या सुमारास हॉस्पिटलचे भांडारपाल धिरज शरद दर्डा आणि त्यांचे सहकारी कर्मचारी मेस रूमला कुलूप लावून घरी गेले होते. मात्र, रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी मेस रूमच्या खिडकीचा आणि दरवाजाचा कडीकोंडा तोडून आत प्रवेश केला. ५ मार्च रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास जेव्हा कर्मचारी ड्युटीवर परतले, तेव्हा त्यांना साहित्याची नासधूस आणि चोरी झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले.

चोरट्यांनी केवळ किरकोळ चोरी न करता, रुग्णांच्या वॉर्डमधील आणि मेसमधील २५ जुने वापरते फॅन (किंमत १५ हजार रुपये), रुग्णांना प्राणवायू पुरवणारी ‘ग्लो लॅम्प’ तांब्याची तार आणि ऑक्सिजन प्लॅट (किंमत १५ हजार रुपये), मेसमध्ये असलेले १७ पैकी भरलेले गॅस सिलेंडर, मोठी पातेली, गंज, स्टीलचे डबे आणि इतर स्वयंपाकाचे साहित्य, तसेच १२ नग फोल्डिंग खुर्च्या आणि वजन मोजण्याचे मशिन,असे ४९ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी भांडारपाल धिरज दर्डा यांच्या फिर्यादीवरून बुलढाणा शहर पोलिसांत भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३४ (१), ३०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार नागरे हे करीत आहेत.

रुग्णांच्या जीवाशी खेळ!

ही केवळ चोरी नसून रुग्णांच्या आरोग्यावर झालेला हल्ला आहे. ऑक्सिजनची तांब्याची पाईपलाईन कापून नेल्यामुळे रुग्णालयाची आपत्कालीन यंत्रणा विस्कळीत झाली आहे. टीबीच्या रुग्णांसाठी हवा आणि ऑक्सिजन या दोन्ही गोष्टी अत्यावश्यक असताना, चोरांनी पंखे आणि पाईपलाईन चोरून नेल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

प्रशासकीय सुरक्षा रामभरोसे?

४ मार्च रोजी घटना घडूनही १३ मार्च रोजी गुन्हा दाखल होणे, यावरून प्रशासकीय दिरंगाईवर प्रश्न उपस्थित होत आहेत. तसेच, एवढ्या मोठ्या प्रमाणावर पंखे आणि जड सिलेंडर्स चोरून नेईपर्यंत सुरक्षारक्षक काय करत होते? असा सवाल आता बुलढाणेकर विचारत आहेत. जिल्ह्यातील शासकीय मालमत्तेवर दिवसाढवळ्या डल्ला मारणाऱ्या या टोळीचा छडा पोलीस लावणार का? आणि रुग्णालयाची सुरक्षा वाढवली जाणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *