स्मार्ट बुलढाणा

रायपूर: ‘महाराजस्व समाधान शिबिरा’तून शासकीय सेवा थेट जनतेच्या दारी

नदीम शेख

चांडोळ,(प्रतिनिधी): “सर्व सेवा एकाच ठिकाणी आणि एकाच दिवशी” हे ब्रीदवाक्य केवळ कागदावर न ठेवता ते प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी महसूल प्रशासन आता जनतेच्या दारी पोहोचले आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या १८ फेब्रुवारी २०२६ च्या निर्णयानुसार, संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अभियान टप्पा क्रमांक १ राबविण्यात येत आहे. याच अभियानाचा भाग म्हणून काल, १४ मार्च २०२६ रोजी, बुलडाणा तालुक्यातील रायपुर येथील श्री. शिवाजी विद्यालयाच्या प्रांगणात भव्य महाराजस्व समाधान शिबिर पार पडले. या शिबिरात शेकडो शेतकरी, महिला आणि विद्यार्थ्यांनी विविध शासकीय योजनांचा लाभ घेतला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बुलडाण्याचे तहसीलदार विठ्ठल कुमरे, मार्गदर्शक म्हणून महसूल विभागाचे अप्पर आयुक्त अजय लहाने तर उपविभागीय अधिकारी शरद पाटील यांची विशेष उपस्थिती होती. जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय कार्यालय व तहसील कार्यालय (बुलडाणा) यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या या शिबिराने रायपुर महसूल मंडळातील नागरिकांचे प्रलंबित प्रश्न जागेवरच निकाली काढले. शिबिरादरम्यान महसूल विभागाने स्टॉल्सच्या माध्यमातून विविध सेवांचे वाटप केले. यामध्ये प्रामुख्याने उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला आणि नॉन-क्रीमिलेयर प्रमाणपत्रांचे जागीच वाटप करण्यात आले. नवीन रेशन कार्डासाठी अर्ज स्वीकारणे, रेशन कार्डातील दुरुस्ती आणि महसूल अभिलेखांमधील त्रुटी दूर करण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात आले. ‘जिवंत सातबारा’ वाटप मोहिमेअंतर्गत शेतकऱ्यांना सातबारा उतारा देण्यात आला. तसेच पी.एम. किसान योजना आणि सलोखा योजनेबाबत मार्गदर्शन करून नवीन अर्ज स्वीकारले गेले. संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांना लाभ वाटप करण्यात आले, तसेच पात्र वंचित नागरिकांचे नवीन अर्ज भरून घेण्यात आले. नागरिकांचे ‘आभा’ कार्ड काढण्यात आले. तसेच ‘प्रधानमंत्री आवास योजने’च्या लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी ५ ब्रास मोफत वाळू देण्याच्या अर्जांना मंजुरी देण्यात आली.

आपल्या मार्गदर्शनात अप्पर आयुक्त अजय लहाने यांनी सामान्य माणसाला शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागू नयेत, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. पारदर्शकता आणि गतिमानता ही या मोहिमेची वैशिष्ट्ये असल्याचे सांगितले.अध्यक्षीय भाषणात तहसीलदार विठ्ठल कुमरे यांनी शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची तांत्रिक माहिती दिली आणि नागरिकांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले. प्रास्ताविकातून नायब तहसीलदार अनंता पाटील यांनी शिबिराच्या आयोजनामागची भूमिका विषद केली.

या प्रसंगी रायपुरचे उपसरपंच हनवते, विलास अहिर, बालाप्रसाद जैस्वाल, एजाज मंत्री, डॉ.बुधवत, अंभोरे, बी.डी.ओ. तायडे, नायब तहसीलदार वाघ, नायब तहसीलदार अहिर यांसह महसूल विभागाचे कर्मचारी, तलाठी, ग्रामसेवक आणि परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सांस्कृतिक रंग आणि लोकसहभाग

केवळ शासकीय कामकाजच नव्हे, तर सामाजिक संदेशाचा भाग म्हणून जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा, रायपुरच्या विद्यार्थ्यांनी ‘मराठी शाळा वाचवा’ अभियानांतर्गत अतिशय सुंदर समूह नृत्य सादर केले. या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *