“राष्ट्राला परम वैभवाकडे नेण्यासाठी सज्जन शक्तीचे संघटन काळाची गरज”: ह.भ.प. सोपान महाराज कनेरकर
धाड, (प्रतिनिधी) : “ज्या देशाला स्वतःची संस्कृती आठवत नाही, तो देश फार काळ टिकू शकत नाही. आज आपल्या देशात राहून पाकिस्तानच्या विजयावर फटाके फोडणारे आणि अयातुल्ला खोमेनीच्या मृत्यूवर शोक व्यक्त करणारे लोक वाढत आहेत. अशा विघातक शक्तींनी खुशाल पाकिस्तानात जाऊन आपला आनंद साजरा करावा. ही संतांची भूमी आहे, येथे अराजकता माजवणार्या कोणत्याही शक्तीला ठेचावेच लागेल. या देशात राहायचे असेल आणि सन्मानाने जगायचे असेल, तर ‘भारत माता की जय’ म्हणावेच लागेल,” अशा प्रखर आणि जज्ज्वल्य शब्दांत प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. सोपान महाराज कनेरकर यांनी हिंदू जनसमुदायाला संबोधित केले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी महोत्सवाचे औचित्य साधून धाड येथे शुक्रवारी, १३ तारखेला ‘विशाल हिंदू संमेलनाचे’ भव्य आयोजन करण्यात आले होते. धाड येथील दिलीप शिंदे यांच्या मळ्यात आयोजित या सोहळ्याने संपूर्ण परिसर भगवामय झाला होता. हजारो हिंदू बांधव आणि माता-भगिनींच्या उपस्थितीने या संमेलनाने विराट रूप धारण केले होते. कार्यक्रमाची सुरुवात अत्यंत भक्तीमय वातावरणात झाली. व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गोमाता पूजन, भारतमाता पूजन, छत्रपती शिवाजी महाराज पूजन आणि प्रभू श्रीरामचंद्रांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या पूजनाने वातावरणात एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली. त्यानंतर शाहीर खांडेभराड यांनी छत्रपती शिवरायांचा जाज्वल्य इतिहास पोवाड्याच्या माध्यमातून मांडला, तर राम वावधने यांनी ‘वैयक्तिक गीत’ सादर करून उपस्थितांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना जागृत केली.

“धर्माची निंदा होत असताना तरुणांचे रक्त सळसळले पाहिजे”: ह.भ.प. सतीश महाराज डोईफोडे
आपल्या उद्बोधनात ह.भ.प. सतीश महाराज डोईफोडे (जागदरी) यांनी तरुणांच्या भूमिकेवर विशेष भर दिला. ते म्हणाले, “आज आपल्या धर्मावर, आपल्या देवांवर चिखलफेक केली जात आहे. जेव्हा आपल्या धर्माची निंदा होते, तेव्हा इथल्या हिंदू तरुणांचे रक्त सळसळले पाहिजे. लव्ह जिहादसारख्या संकटांच्या माध्यमातून आपल्या धर्मावर पद्धतशीर आघात होत आहेत. आपल्या माता-भगिनींना आणि युवतींना या जाळ्यात ओढले जात आहे. अशा वेळी केवळ शांत राहून चालणार नाही, तर प्रत्येक हिंदू तरुणीने आणि तरुणाने जागरूक राहून धर्माचे रक्षण करणे हे आपले पहिले कर्तव्य मानले पाहिजे”, असे आवाहन ह.भ.प. सतीश महाराज डोईफोडे यांनी केले.

स्त्रीशक्ती आणि संस्कारांचे महत्त्व: प.पू. साध्वी त्रिवेणी देशमुख
स्त्रीशक्तीचे महत्त्व अधोरेखित करताना प.पू. साध्वी त्रिवेणी देशमुख यांनी अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, “आजच्या काळात कुटुंबातील संवाद हरवत चालला आहे आणि त्याची जागा वादाने घेतली आहे. जीवनात पुण्यवान संतती लाभणे हे भाग्याचे लक्षण आहे, पण त्यासाठी गर्भाधान संस्कार आणि बालपणीचे संस्कार महत्त्वाचे आहेत. मुलगा किंवा मुलगी शीलवान निघाले, तर ते आईच्या संस्काराचे फळ असते. संतांच्या संगतीत राहून मुलांना घडवणे ही काळाची गरज आहे. जर मुलांवर आज चांगले संस्कार झाले नाहीत, तर उद्याची पिढी भरकटलेली असेल. ही जबाबदारी प्रामुख्याने स्त्रियांनी उचलण्याचे आवाहन प.पू. साध्वी त्रिवेणी देशमुख यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक अंबादास साठे यांनी संघाचा स्वयंसेवक हा केवळ तासाभराच्या शाखेत तयार होतो, पण तिथे मिळणारे संस्कार त्याला देशासाठी आणि धर्मासाठी प्राणाची आहुती देण्यासही प्रवृत्त करतात. देव, देश आणि धर्मासाठी समर्पित राहणे हाच संघाचा मूळ मंत्र असल्याचे सांगितले.
“धर्मासाठी धन आणि वेळ खर्च करा”: सोपान महाराज
मुख्य वक्ते म्हणून बोलताना सोपान महाराज कनेरकर यांनी समाजाच्या सद्यस्थितीवर सडेतोड भाष्य करत आपण कमावलेल्या धन-संपत्तीचा काही हिस्सा हा धर्मकार्यासाठी वापरला गेला पाहिजे. हिंदू संमेलनाच्या माध्यमातून केवळ गर्दी जमवणे हा उद्देश नसून, समाजाचे वास्तव परिवर्तन होणे गरजेचे आहे. आज आपण पाश्चात्य संस्कृतीच्या अंधानुकरणामागे लागलो आहोत. वाढदिवसाला मेणबत्त्या विझवणे ही आपली संस्कृती नाही. आपले सण पारंपारिक पद्धतीने आणि श्रद्धेने साजरे करा. परकीय संस्कृतीचे आक्रमण थोपवून आपल्या मूळ हिंदू संस्कृतीची जोपासना करण्यासाठी सज्जन शक्तीने एकत्र येण्याची वेळ आली आहे. कीर्तनकारांनी कोणताही पक्षभेद करू नये. मात्र, ज्या पक्षाची विचारसरणी हिंदू धर्माच्या आस्थेशी जोडलेली आहे आणि जो पक्ष हरिनामाचा सन्मान करतो, तोच पक्ष कीर्तनकारांचा असला पाहिजे, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. देशांतर्गत सुरू असलेल्या अराजकतेवर तीव्र संताप व्यक्त करत कायद्याची पायमल्ली करणाऱ्या आणि सामाजिक शांतता भंग करणाऱ्या शक्तींना वेळीच रोखले पाहिजे, असा इशारा त्यांनी दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय महाराज नेमाने यांनी केले, तर उपस्थितांचे आभार भय्या सोनटक्के यांनी मानले. या विशाल संमेलनाच्या यशस्वीतेसाठी धाड परिसरातील स्वयंसेवकांनी अहोरात्र परिश्रम घेतले होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित हजारो नागरिकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. या विशाल हिंदू संमेलनाने परिसरातील हिंदू समाजात एक नवीन चैतन्य निर्माण केले असून, ‘सज्जन शक्तीचे संघटन’ हा संदेश घराघरात पोहोचवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. या संमेलनात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती, ज्यामुळे हे संमेलन केवळ पुरुषांचे नसून संपूर्ण हिंदू कुटुंबाचे शक्तीप्रदर्शन ठरले.

