राजकारण

आसाम टू धाड: बोगस मतदारांची फॅक्टरी? हिंदवार्ताचा ‘धडाकेबाज’ ग्राऊंड रिपोर्ट!

धाड : बुलढाणा जिल्ह्यातील धाड परिसरातून लोकशाहीला काळीमा फासणारा एक अत्यंत गंभीर प्रकार समोर आला आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे आणि प्रशासनाच्या डोळ्यात धूळ फेकून शेकडो परप्रांतीयांची नावे स्थानिक मतदार यादीत घुसवण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. एकट्या धाड नगरीमध्ये हा बोगस मतदारांचा आकडा एक ते दीड हजारांच्या घरात असल्याची चर्चा असून, यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. “जोवर मतदार यादीतून बोगस नावे काढली जात नाहीत, तोवर निवडणुका घेऊ नका, अन्यथा आम्ही मतदानावर बहिष्कार टाकू,” असा आक्रमक पवित्रा धाडवासीयांनी घेतला आहे.

मिळालेल्या अधिकृत पुराव्यांनुसार, या रॅकेटचे धागेदोरे थेट आसाम राज्यापर्यंत जोडलेले आहेत. ‘मोनजुमा खातून’ (Monjuma Khatun) नावाच्या एका महिला मतदाराचा जो ‘आधार अपडेट रेकॉर्ड’ समोर आला आहे, त्यावरून या घोटाळ्याची मोडस ऑपरेंडी स्पष्ट होते. सदर महिलेचे मूळ रहिवासी प्रमाणपत्र आणि जुना पत्ता धुबरी, आसाम (७८३३२४) येथील आहे. मात्र, अत्यंत चलाखीने आणि बनावट संमतीपत्र किंवा भाडेकराराच्या आधारे तिचा पत्ता बदलून ‘आझाद चौक, धाड, बुलढाणा’ असा करण्यात आला.

केवळ पत्ताच बदलला नाही, तर याच बनावट पुराव्याच्या आधारे निवडणूक ओळखपत्र (उदा. Voter ID No. UEY4749982) मिळवून तिचे नाव स्थानिक मतदार यादीत समाविष्ट करण्यात आले. हा केवळ एक नमुना असून, असे शेकडो परप्रांतीय मजूर धाडमध्ये ‘स्थानिक’ बनवून बसले आहेत. मतदान हा पवित्र अधिकार आहे, मात्र तो बनावट मार्गाने मिळवणे हा राष्ट्रद्रोह आहे. परप्रांतातून आलेल्या मजुरांच्या आडोशाने स्थानिक राजकारणाची दिशा बदलण्याचा हा प्रयत्न धाडची जनता कदापि सहन करणार नाही. आता चेंडू जिल्हाधिकारी आणि निवडणूक आयोगाच्या कोर्टात आहे. जर वेळेत कारवाई झाली नाही, तर धाडमधील संताप रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही.

१५०० बोगस मतदार: लोकशाहीला वाळवी लावण्याचा प्रयत्न!

धाडमध्ये विविध कामांसाठी परप्रांतातून येणाऱ्या मजुरांची संख्या मोठी आहे. याच मजुरांना राजकीय स्वार्थासाठी किंवा विशिष्ट हेतूने ‘व्होट बँक’ म्हणून वापरले जात असल्याचे बोलले जात आहे. बनावट दाखले, बनावट रहिवासी पुरावे आणि आधार कार्डातील छेडछाड करून मतदार यादी फुगवण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकट्या धाडमध्ये दीड हजारावर बोगस मतदार आहेत. जर हे मतदार निवडणुकीत मतदान करणार असतील, तर स्थानिक जनतेचा कौल आणि लोकशाहीचा मूळ गाभाच नष्ट होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

“आधी यादी दुरुस्त करा, मगच मतदान घ्या!”

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, धाडमधील नागरिक आता आक्रमक झाले आहेत. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आगामी निवडणुकांवर या घोटाळ्याचे सावट आहे. “जोवर ही बोगस नावे मतदार यादीतून बाद केली जात नाहीत, तोवर प्रशासनाने निवडणुका घेऊ नयेत,” अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. जर प्रशासनाने हलगर्जीपणा करून बोगस यादीनुसारच मतदान प्रक्रिया राबवण्याचा प्रयत्न केला, तर संपूर्ण धाड नगरी मतदानावर बहिष्कार टाकेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.

प्रशासकीय यंत्रणा झोपली आहे का?

एवढ्या मोठ्या प्रमाणावर परप्रांतीयांची नावे यादीत समाविष्ट होताना स्थानिक बीएलओ (BLO), तलाठी आणि निवडणूक विभागाने काय केले? कागदपत्रांची पडताळणी का झाली नाही? आधार कार्ड अपडेट करताना सादर केलेले पुरावे खरे होते की खोटे, याची खातरजमा का केली गेली नाही? हे प्रश्न आता अनुत्तरित आहेत. हे केवळ प्रशासकीय दुर्लक्ष नसून, यामध्ये एखाद्या मोठ्या संघटित टोळीचा किंवा राजकीय हस्तक्षेपाचा हात असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

 

‘हिंदवार्ता’चे सवाल आणि मागण्या:

प्रशासनाने तातडीने धाडमधील प्रत्येक संशयास्पद मतदाराच्या घरी जाऊन त्याची प्रत्यक्ष पडताळणी करावी. बनावट आधार कार्ड आणि रहिवासी दाखले बनवून देणाऱ्या सीएससी सेंटर्स आणि एजंटांवर कठोर कारवाई करून त्यांचे परवाने रद्द करावेत. परप्रांतीयांना बनावट दाखले देणाऱ्या स्थानिक अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांना निलंबित करावे. मतदार यादी दुरुस्तीची प्रक्रिया कॅमेऱ्याच्या निगराणीत किंवा तटस्थ समितीमार्फत राबवण्यात यावी, आशा मागण्या “हिंदवार्ता”ने केल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *