छत्रपती संभाजीनगर

खळबळजनक: ५० लाखांसाठी ‘रीलस्टार’ बनला ‘रिअल’ कसाई!

छत्रपती संभाजीनगर,(प्रतिनिधी): सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स, आलिशान जॅग्वार कार, बड्या राजकीय नेत्यांशी संबंध आणि ग्लॅमरस लाईफस्टाईल… पण या चकाकीच्या मागे दडला होता एक क्रूर खुनी! छत्रपती संभाजीनगरमध्ये एका रीलस्टारने आपल्याच निवृत्त प्राध्यापक मित्राची ५० लाख रुपयांच्या वादातून अत्यंत निर्घृणपणे हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ‘दृश्यम’ चित्रपटाचा प्रभाव असलेल्या या रीलस्टारने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी जंगजंग पछाडले, पण अखेर खाकीच्या नजरेतून तो सुटू शकला नाही.

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून निवृत्त झालेले प्राध्यापक राजाराम सुभराव लोंढे (वय ६० वर्षे) आणि रीलस्टार विशाल विकास राठोड (वय २४ वर्षे) यांची एका महिलेमार्फत मैत्री झाली होती. विशालला ‘व्हू अँड डेअर’ नावाचा रिॲलिटी शो बनवायचा होता, त्यासाठी त्याने लोंढे यांच्याकडून ५७ लाख रुपये उसने घेतले होते. १० लाख परत केले, पण उरलेल्या ४७ लाखांसाठी लोंढे यांनी तगादा लावला होता. याच पैशांच्या वादातून विशालने लोंढे यांचा काटा काढण्याचे ठरवले.

५ फेब्रुवारी रोजी दौलताबाद येथील एका फार्म हाऊसवर पार्टी आयोजित करण्यात आली. या पार्टीत लोंढे यांना बेसावध करून, त्यांच्याच बंदुकीतून त्यांच्या डोक्यात गोळी झाडून विशालने त्यांची हत्या केली. या प्रकरणात रीलस्टारसह आकाश पवार आणि करण आडे यांनाही बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. आरोपीने दोन खड्डे का खोदले होते आणि मृतदेहाचा चेहरा का ठेचला, लोंढे यांच्याकडे स्वतःची बंदूक होती की नाही, याचा तपास पोलीस करत आहेत. पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेने या गुंतागुंतीच्या खुनाचा छडा लावला. सध्या तिन्ही आरोपी पोलीस कोठडीत असून, या प्रकरणामागे केवळ पैसे हेच कारण आहे की आणखी काही काळंं-बेरं आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.

दृश्यम’ स्टाईल बनाव: पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न

हत्येचा कट इतका भयानक होता की विशालने तीन दिवस आधीच जेसीबीने खड्डे खोदून ठेवले होते. हत्या केल्यानंतर लोंढे यांना सिग्मा हॉस्पिटलजवळ सोडल्याचे भासवले जेणेकरून सीसीटीव्हीत तसे दिसावे. लोंढे यांचा मोबाईल घेऊन विशाल पुण्याला गेला. तिथे फोन सुरू करून “I am in personal work… don’t call” असे स्टेटस ठेवले, जेणेकरून सर्वांना वाटावे की ते जिवंत आहेत आणि कामात व्यस्त आहेत. मृतदेह पुरल्यानंतर चेहरा ओळखता येऊ नये म्हणून तो क्रूरपणे ठेचला. जेसीबी चालकाला खड्डे खोदण्यासाठी ‘गुप्तधन’ काढायचे असल्याचे सांगून फुकटात काम करून घेतले.

पोलिसांची ‘ती’ एक नजर आणि खुन्याचा पर्दाफाश

गुन्हेगाराने कितीही हुशारी दाखवली तरी तो पुरावा सोडतोच. आयआयटीमधून उत्तीर्ण झालेल्या एका विद्वान प्राध्यापकाची इंग्रजी इतकी साधी असूच शकत नाही, हे पोलिसांच्या लक्षात आले. लोंढे यांच्या भावाचा संशय आणि पोलिसांचा तांत्रिक तपास यामुळे विशाल राठोड आणि त्याचे साथीदार आकाश पवार व करण आडे जाळ्यात अडकले. कडक चौकशीनंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आणि तब्बल ४० दिवसांनंतर पोलिसांनी खड्ड्यातून कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह बाहेर काढला.

कोण आहे हा रीलस्टार विशाल राठोड?

विशाल राठोड हा सोशल मीडियावरील एक प्रसिद्ध चेहरा होता. त्याचे १.७५ लाख फॉलोअर्स असून तो महागड्या गाड्या आणि स्मार्टफोनसाठी ओळखला जात होता. २२ मार्च २०२५ रोजी त्याने वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी ‘जॅग्वार’ कार खरेदी केली होती, ज्याची मोठी चर्चा झाली होती. अनेक शोरूमच्या उद्घाटनांना तो पाहुणा म्हणून जायचा. मात्र, ही सर्व ऐशोआरामी लाइफस्टाईल कर्जाच्या आणि गुन्हेगारीच्या पैशावर उभी होती, हे आता स्पष्ट झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *