पवित्र रमजानमध्ये काळाचा घाला:हातावर ‘आई-मुलांची काळजी घ्या’ लिहून क्रेन ऑपरेटरने संपवले जीवन
मोताळा, (बुलढाणा): एकीकडे सर्वत्र पवित्र रमजान महिन्याचा उत्साह, उपवास आणि इबादत सुरू असतानाच, एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करणाऱ्या एका तरुण क्रेन ऑपरेटरने मृत्यूला कवटाळले आहे. विशेष म्हणजे, आत्महत्या करण्यापूर्वी त्याने स्वतःच्या हातावर लिहिलेला शेवटचा संदेश वाचून उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. “मेरी माँ और बच्चों का खयाल रखना”, असे आपल्या हातावर लिहून सलमान खान अमीर खान पठाण या तरुण पित्याने जगाचा निरोप घेतला.
शिरपूर (ता. बुलढाणा) येथील रहिवासी असलेले सलमान खान हे क्रेन ऑपरेटर म्हणून काम करत होते. गेल्या ५-६ दिवसांपासून ते मोताळा तालुक्यातील गोसिंग गावात सरोदे यांच्या शेतात विहिरीच्या कामावर हायड्रा क्रेन मशीन चालवत होते. मात्र, आज १६ मार्च रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास सलमान खान यांनी क्रेनलाच लटकून गळफास घेतल्याची धक्कादायक बातमी समोर आली.
सलमान खान यांचे आयुष्य संघर्षाने भरलेले होते. त्यांच्या एका पायात रॉड टाकलेला होता, ज्यामुळे त्यांना चालताना त्रास व्हायचा. तरीही, घरातली म्हातारी आई, पत्नी आणि लहान मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांनी कष्टाची साथ सोडली नव्हती. शारिरीक व्याधी असतानाही ते क्रेन मशीन ऑपरेटर म्हणून जोखीम पत्करून काम करत होते. अशा जिद्दी माणसाने अचानक टोकाचे पाऊल उचलल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
ही घटना केवळ आत्महत्या नसून त्यामागे काहीतरी वेगळे कारण असावे, असा खळबळजनक संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. सलमानचे चुलत भाऊ जाबीर खान दिलावर खान पठाण यांनी बोराखेडी पोलिसांत याप्रकरणी तक्रार दिली असून घटनास्थळाची परिस्थिती आणि परिस्थितीची दाहकता पाहता, नातेवाईकांनी क्रेन मालक आणि कामावर हजर असलेल्या इतर मजुरांवर संशय व्यक्त केला आहे. एक कष्टकरी बाप, एक आधार देणारा मुलगा आणि आपल्या कामाशी प्रामाणिक असणारा ऑपरेटर अशा प्रकारे निघून गेल्याने शिरपूर गावावर शोककळा पसरली आहे. आता सर्वांचे लक्ष पोलीस तपासाकडे लागले आहे की, ही आत्महत्याच होती की यामागे काही गंभीर कारस्थान दडले आहे?
घटनेची माहिती मिळताच बोराखेडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून मर्ग दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस अंमलदार सुपडासिंग चव्हाण हे करीत आहेत.
आणि शेवटचा निरोप
सध्या इस्लाम धर्मातील अत्यंत पवित्र मानला जाणारा रमजान महिना सुरू आहे. संयम आणि प्रार्थनेच्या या महिन्यात अशी दुर्दैवी घटना घडल्याने मुस्लिम बांधवांमध्ये मोठी शोककळा पसरली आहे. मरण्यापूर्वी आपल्या हातावर लिहिलेला संदेश हा त्याच्या कुटुंबाप्रती असलेल्या ओढीचा पुरावा ठरला आहे.

