मौलाना आझाद चौकात वारंवार अपघात: नागरिकांची गतिरोधक बसवण्याची मागणी
अभिनय बोर्डे
धाड,(प्रतिनिधी): तालुकास्तरीय गाव असलेल्या धाड येथून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ हा परिसरातील अतिशय महत्त्वाचा आणि वर्दळीचा मार्ग मानला जातो. या महामार्गावरील मौलाना आझाद चौक परिसरात दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा होत असते. दुचाकी,चारचाकी, मालवाहतूक ट्रक तसेच प्रवासी वाहनांची सततची वर्दळ असल्यामुळे या ठिकाणी वाहतुकीचा ताण कायम असतो. यामुळे होणाऱ्या अपघाताच्या संख्येत वाढ झाली असतांनाही संबंधित प्रशासन अद्यापही सुस्तच असल्याचे दिसून येत आहे.
विशेष म्हणजे मौलाना आझाद चौकाच्या जवळच मुस्लिम समाजाचे अरबी मदरसा व मशिद असून येथे लहान मुले, नागरिक आणि भाविकांची मोठ्या प्रमाणात ये जा सुरू असते. शाळकरी मुले, बाजारासाठी येणारे नागरिक तसेच स्थानिक व्यापारी यामुळे हा चौक नेहमीच गजबजलेला असतो. त्यामुळे वाहनांचा वेग नियंत्रणात नसल्यास अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही
स्थानिक नागरिकांच्या मते, या चौकात आठवड्याला किंवा महिन्याला किमान एक तरी लहान-मोठा अपघात घडत असतो. अनेक वेळा वाहनचालक भरधाव वेगाने येत असल्यामुळे पदचारी आणि विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे, या संदर्भात ग्रामस्थांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी संबंधित प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही.
नागरिकांचे म्हणणे आहे की,मौलाना आझाद चौकात गतिरोधक (स्पीड ब्रेकर) बसवण्यात आल्यास वाहनांचा वेग कमी होईल आणि अपघात टाळता येतील. तसेच येथे वाहतूक सूचना फलक व झेब्रा क्रॉसिंग देखील करणे गरजेचे असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. म्हणूनच शासन व संबंधित विभागाने या गंभीर समस्येकडे तात्काळ लक्ष देऊन मौलाना आझाद चौक येथे गतिरोधक बसवावे, जेणेकरून वाहनांची गती नियंत्रित राहील आणि नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होणार नाही, अशी नम्र मागणी धाड येथील नागरिकांनी केली आहे.

