स्मार्ट बुलढाणा

जिओचा ‘झोल’! नेटवर्क गायब झाल्याने ग्राहक आक्रमक

अभिनय बोर्डे

धाड,(प्रतिनिधी) : “डिजिटल इंडिया”चा नारा देत घराघरात पोहोचलेल्या रिलायन्स जिओ कंपनीच्या मनमानी कारभाराचा फटका आता सर्वसामान्यांना बसू लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण जिल्ह्यासह विशेषतः ग्रामीण भागात जिओचे नेटवर्क ‘आयसीयू’त गेल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. कॉल न लागणे, इंटरनेटचा वेग कासवगती होणे आणि वारंवार सिग्नल गायब होणे या समस्यांमुळे ग्राहकांचा संयम आता सुटला आहे. परिणामी, संतापलेले ग्राहक आता ‘जिओ’ला रामराम ठोकून इतर कंपन्यांकडे वळत असून, मोबाईल पोर्ट करण्यासाठी दुकानांवर लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

ग्रामीण भागातील परिस्थिती अत्यंत दयनीय आहे. घरात बसून संवाद साधणे आता स्वप्नवत झाले असून, फोनवर बोलण्यासाठी ग्राहकांना घराबाहेर, मोकळ्या मैदानात किंवा चक्क घराच्या छतावर चढावे लागत आहे. इंटरनेट अभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, शासकीय कार्यालयांमधील ऑनलाइन कामे ठप्प झाली आहेत. महसूल, बँकिंग आणि दैनंदिन व्यवहारांवर याचा गंभीर परिणाम झाला आहे. डिजिटल युगात जिओने ग्राहकांना “नेटवर्कच्या वनवासात” पाठवल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

नेटवर्कच्या या त्रासाला कंटाळून ग्राहकांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. जिल्ह्यात, विशेषतः धाड परिसरात जिओ सोडून इतर कंपन्यांकडे जाणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. मोबाईल शॉपी, सेवा केंद्रे आणि अगदी चौकाचौकात लावलेल्या स्टॉल्सवर ग्राहकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. “पैसे देऊनही सेवा मिळत नसेल, तर कंपनी बदललेलीच बरी,” अशी भूमिका घेत नागरिक भराभर आपले नंबर पोर्ट करत आहेत. धाड जिल्हा यामध्ये अग्रस्थानी असल्याचे चित्र असून, दररोज शेकडो ग्राहक जिओला कायमचा निरोप देत आहेत.

रिलायन्स जिओने जर तातडीने आपल्या टॉवर्सची क्षमता वाढवून नेटवर्क समस्या सुधारली नाही, तर आगामी काळात कंपनीला जिल्ह्यातून गाशा गुंडाळावा लागेल, अशी चिन्हे दिसत आहेत. ग्राहकांनी सुरू केलेली ही ‘पोर्ट’ची लाट म्हणजे कंपनीसाठी धोक्याची घंटा आहे. आता कंपनी प्रशासन यावर काही ठोस उपाययोजना करते की ग्राहकांना वाऱ्यावर सोडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विद्यार्थी आणि व्यावसायिकांचे कंबरडे मोडले

आजच्या काळात शिक्षण आणि व्यापार पूर्णपणे इंटरनेटवर अवलंबून आहे. मात्र, जिओच्या लहरी नेटवर्कमुळे ऑनलाइन क्लासेस करणाऱ्या विद्यार्थ्यांची लिंक वारंवार तुटत आहे. स्पर्धा परीक्षेचे फॉर्म भरताना किंवा महत्वाचे ई-मेल पाठवताना नेटवर्क गायब होण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे तरुणांमध्ये कंपनीविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

सिमकार्ड म्हणजे शोभेची वस्तू

जिओचे सिम कार्ड आता फक्त शोभेची वस्तू उरली आहे. रिचार्जचे दर वाढले मात्र सेवा रसातळाला गेली आहे. तासन् तास इंटरनेट चालत नाही, मग पैसे कशासाठी द्यायचे?, अशी संतप्त प्रतिक्रिया उज्ज्वल थोरात नामक ग्राहकाने दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *