मलकापूरजवळ भीषण अपघात: भरधाव कंटेनरने पिकअपला दिली धडक
अजय टप
मलकापूर (प्रतिनिधी): राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर मुंदडा पेट्रोल पंपाजवळ एका भरधाव कंटेनरने बोलेरो पिकअपला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात पिकअपमधील चालकासह तीन मजूर जखमी झाले असून, पिकअप वाहन रस्त्याच्या खाली उलटल्याची घटना १४ मार्च रोजी घडली. याप्रकरणी आज १७ मार्च रोजी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव जिल्ह्यातील वरणगाव येथील रहिवासी असलेले पंकज मंगल धनगर (वय ३५ वर्ष, व्यवसाय: ड्रायव्हर) हे आपल्या एमएच-१९-सीएक्स-३४२९ क्रमांकाच्या बोलेरो पिकअप वाहनाने मजुरांना घेऊन हैदराबाद येथून परत येत होते. १४ मार्च २०२६ रोजी पहाटे २ वाजेच्या सुमारास त्यांचे वाहन मलकापूर शहरातील मुंदडा पेट्रोल पंपाजवळून जात असताना, मागून येणाऱ्या कंटेनर क्रमांक डीडी-०१-एन-९७१३ क्रमांकाच्या चालकाने आपल्या ताब्यातील वाहन अतिशय निष्काळजीपणे व भरधाव वेगाने चालवून पंकज धनगर यांच्या पिकअपला उजव्या बाजूने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, पिकअप वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि वाहन थेट रस्त्याच्या खाली उतरून पलटी झाले. या अपघातात फिर्यादी पंकज धनगर यांच्यासह वाहनात बसलेले इतर तीन मजूर जखमी झाले आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वाहनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती.
याप्रकरणी फिर्यादी पंकज धनगर यांनी आज १७ मार्च रोजी मलकापूर शहर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी कंटेनर चालक अजय कुमार गुलाबचंद दहिया (वय ३० वर्षे) रा.मडवा, जि.रोवा (मध्य प्रदेश) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम २८१, १२५ (अ) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार रामचंद्र भोपळे हे करीत आहेत.

