अंढेरा पोलिसांच्या नाकाखाली बायगाव बुद्रुक येथे दरोडा
चिखली,(प्रतिनिधी): एकीकडे पोलीस प्रशासनाकडून गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्याचे दावे केले जात असताना, दुसरीकडे अंढेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुन्हेगारांनी उच्छाद मांडला आहे. १७ मार्चच्या मध्यरात्री बायगाव बुद्रुक येथे सशस्त्र दरोडा टाकून अज्ञात चार चोरट्यांनी दोन शेतकऱ्यांच्या कुटुंबांना चाकूचा धाक दाखवत तब्बल ५ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे सावट पसरले असून, “अंढेरा पोलीस झोपलेत की काय?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.
बायगाव बुद्रुक येथील शेतकरी भगवान विष्णू खरात हे आपल्या शेतात कुटुंबासह वास्तव्यास आहेत. १७ मार्चच्या रात्री जेवण करून सर्वजण गाढ झोपेत असताना, तोंड बांधलेल्या चार अज्ञात दरोडेखोरांनी त्यांच्या घरावर धाड टाकली. बाहेर बाजेवर झोपलेल्या भगवान खरात यांच्या गळ्याला थेट चाकू लावून दरोडेखोरांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आणि घर उघडण्यास भाग पाडले. धक्कादायक बाब म्हणजे, या नराधमांनी खरात यांच्या पत्नीच्या अंगावरील एकदाणी, कानातील फुले, सोन्याचे मंगळसूत्र आणि मणी पोत अक्षरशः ओरबाडून घेतले. एवढ्यावरच न थांबता त्यांनी घरातील कपाटाची तोडफोड करून त्यातील २१ हजार रुपयांची रोकड लंपास केली.
दुसऱ्या घटनेतही लूटमार सुरूच!
खरात यांच्या घरी दरोडा टाकल्यानंतर या टोळीने आपला मोर्चा शेजारील शिवनारायण भगवान ताकतोडे यांच्याकडे वळवला. ताकतोडे हे आपल्या शेतात गव्हाच्या खळ्यावर झोपले असताना रात्री साडेअकराच्या सुमारास या चारही दरोडेखोरांनी त्यांना चाकूचा धाक दाखवून गाठले. त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याची पोत आणि कानातील दागिने बळजबरीने काढून घेतले. दोन्ही घटनांमधील चोरीला गेलेल्या ऐवजाची किंमत सुमारे ५ लाख रुपयांच्या घरात आहे.
साहसी नागरिकांपुढे दरोडेखोर हतबल; एक आरोपी जेरबंद!
दरोडा टाकून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना, एका दरोडेखोराचा पाय घसरला आणि तो ओट्यावरून खाली पडला. यावेळी प्रसंगावधान राखून जमलेल्या नागरिकांनी त्याला जागीच पकडले आणि चांगलाच चोप दिला. जखमी अवस्थेत असलेल्या या आरोपीला अंढेरा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून, सध्या त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालय, बुलढाणा येथे उपचार सुरू आहेत. पकडलेल्या आरोपीकडून उर्वरित तीन साथीदारांची नावे व पत्ता उघड होण्याची शक्यता आहे. सध्या या प्रकरणाचा तपास ठाणेदार रुपेश शक्करगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. फरार झालेल्या तीन आरोपींना पोलीस कधी बेड्या ठोकतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अंढेरा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह!
बायगाव बुद्रुक आणि परिसरात चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार रुपेश शक्करगे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक तपास करत असले तरी, नागरिकांच्या मनात सुरक्षेबद्दल मोठी शंका आहे. “पोलीस गस्त घालतात की फक्त कागदावर?” असा सवाल आता सामान्य जनता विचारत आहे. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे पोलिसांचे खबऱ्यांचे जाळे कमकुवत झाले असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.
- “आम्ही शेतात रात्रंदिवस राबतो, पण आता स्वतःच्या घरात आणि शेतातही सुरक्षित नाही. पोलिसांनी जर तातडीने कठोर पावले उचलली नाहीत, तर आम्हाला स्वसंरक्षणासाठी कायदा हातात घ्यावा लागेल.”: संतप्त नागरिक, बायगाव बुद्रुक.

