स्मार्ट बुलढाणा

प्रशासनाचा ‘धाक’ अन् कर्तव्याची ‘धडाक’!

अजय टप

मलकापूर,(प्रतिनिधी): सर्वसामान्य जनतेच्या हक्काचा गॅस पळवून त्याचा काळाबाजार करणाऱ्यांविरुद्ध आता प्रशासनाने कंबर कसली आहे. पुरवठा अधिकारी धनश्री हरणे यांनी आपल्या पथकासह शहरात धाडसत्र राबवत, घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर करणाऱ्यांचे धाबे दणाणून सोडले आहेत. अवघ्या एका दिवसात २० ते २२ ठिकाणी छापेमारी करत ११ सिलिंडर जप्त करून हरणे यांनी नियमबाह्य काम करणाऱ्यांना कडक इशारा दिला आहे.

आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासू नये, यासाठी शासन स्तरावर मोठे प्रयत्न सुरू आहेत. अशा संवेदनशील काळात काही घटक घरगुती गॅसचा वापर व्यावसायिक कारणांसाठी करून सर्वसामान्यांच्या पुरवठ्यावर गदा आणत आहेत. ही बाब लक्षात घेऊन, पुरवठा अधिकारी धनश्रीताई हरणे यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता थेट मैदानात उतरून कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यांच्या या तत्परतेमुळे सर्वसामान्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

तहसीलदार समाधान सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन करण्यात आलेल्या दक्षता पथकाने १७ मार्च रोजी शहराचा कोपरा अन् कोपरा पिंजून काढला. हॉटेल, ढाबे आणि मंगल कार्यालयांवर लक्ष करत जिथे घरगुती गॅसचा सर्रास गैरवापर होतो, अशा ठिकाणांना या पथकाने टार्गेट केले. जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून, जप्त केलेले ११ सिलिंडर हे प्रशासनाच्या निर्धाराचे प्रतीक मानले जात आहेत. प्रशासनाच्या या ‘दबंग’ भूमिकेमुळे काळाबाजार करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, मलकापूर पुरवठा विभागाच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

अफवांना लगाम आणि विश्वासाचे वातावरण

केवळ कारवाईच नाही, तर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरू नये यासाठीही प्रशासनाने पावले उचलली आहेत. पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, घरगुती सिलिंडरचा वापर फक्त घरासाठीच व्हावा. जर कोणी व्यावसायिक कारभारासाठी गरिबांच्या गॅसवर डल्ला मारत असेल, तर त्याची गय केली जाणार नाही. ही तर केवळ सुरुवात आहे!, असा इशाराही पुरवठा अधिकारी धनश्री हरणे यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *