क्राईम जगत

८ दिवसांनंतर अखेर ‘अज्ञात’ चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल!

अजय टप

मलकापूर,(प्रतिनिधी): शहराच्या पाणीपुरवठा विभागाच्या सुरक्षिततेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे. मलकापूर नगर परिषदेच्या वॉटर फिल्टर प्लांट परिसरातील ५ मौल्यवान झाडे अनधिकृतपणे तोडून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. या प्रकरणावरून राजकीय आणि सामाजिक संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर, अखेर १७ मार्च रोजी नगर परिषद प्रशासनाला जाग आली असून शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

८ मार्च रोजी मलकापूर नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वॉटर फिल्टर प्लांट परिसरातून ५ सुबाभळीची झाडे अज्ञात व्यक्तींनी बेकायदेशीरपणे तोडून लंपास केल्याचे समोर आले होते. सरकारी मालमत्तेची अशा प्रकारे चोरी होणे ही गंभीर बाब असतानाही, नगर परिषद प्रशासनाकडून सुरुवातीला कमालीची गुप्तता पाळण्यात आली. घटनेला ८ दिवस उलटूनही कोणतीही कायदेशीर हालचाल न झाल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले होते.

प्रहार जनशक्ती पक्ष आणि भीम गर्जना संघटनेचा एल्गार

नगर परिषद प्रशासनाच्या या ढिम्म कारभारावर प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप आणि भीम गर्जना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भिवाभाऊ चोपडे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. “नगर परिषदेच्या जागेतून झाडे चोरीला जातात आणि प्रशासन शांत कसे?” असा सवाल करत त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. या दोन्ही नेत्यांनी नगर परिषदेला लेखी निवेदन देऊन तातडीने संबंधित दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती. जर कारवाई झाली नाही, तर तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता. या दबावामुळे अखेर प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली.

वाढत्या जनक्षोभाचा विचार करता, १७ मार्च रोजी मलकापूर नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी विठ्ठल भुसारी यांनी ५ सुबाभळीची झाडे (अंदाजे किंमत ५,००० रुपये) चोरीला गेल्याची अधिकृत तक्रार मलकापूर शहर पोलिसांत दिली. या तक्रारीच्या आधारे मलकापूर शहर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३२४ (२) अन्वये अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह?

झाडांची कत्तल ८ मार्चला झाली असताना तक्रार द्यायला १७ मार्च का उजाडला? हा प्रश्न सध्या शहरात चर्चेचा विषय ठरत आहे. ५ हजार रुपयांचे नुकसान असल्याचे तक्रारीत म्हटले असले, तरी सरकारी जागेत घुसून झाडे तोडण्याचे धाडस कोणाचे? यामध्ये कोणाचे अभय तर नव्हते ना? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. शहर पोलीस आता या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, वॉटर फिल्टर प्लांट परिसरातील सीसीटीव्ही फुटेज किंवा प्रत्यक्षदर्शींच्या माहितीवरून चोरट्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

  •  “नगर परिषदेची मालमत्ता ही जनतेची मालमत्ता आहे. तिची चोरी होत असेल तर प्रशासनाने तात्काळ पावले उचलणे गरजेचे होते. उशिरा का होईना गुन्हा दाखल झाला आहे, आता पोलिसांनी त्या चोरट्यांचा शोध घ्यावा.”अजय टप, जिल्हा उपप्रमुख, प्रहार जनशक्ती पक्ष.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *