धाड परिसरात ‘वरुणराजा’चे थैमान: सोसाट्याचा वारा अन् विजांच्या कडकडाटासह दीड तास झोडपले!
अभिनय बोर्डे
धाड,(प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या असह्य उकाड्यानंतर, आज १९ मार्चच्या रात्री ८.३० वाजता नंतर धाड परिसराला निसर्गाच्या भीषण कोपाचा सामना करावा लागला. अचानक आलेल्या अवकाळी पावसाने विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह तब्बल दीड तास चांगलेच थैमान घातले. या वादळी पावसाने जनजीवन विस्कळीत केले असून, मोठ्या प्रमाणावर मालमत्तेचे नुकसान झाले आहे.
सायंकाळच्या सुमारास आकाशात अचानक काळेकुट्ट ढग जमा झाले आणि पाहता पाहता वातावरणात बदल झाला. सोसाट्याचा वारा इतका वेगवान होता की, अनेक भागांत धुळीचे लोट उसळले. त्यानंतर सुरू झालेल्या पावसाने दीड तास विश्रांती न घेता धाड शहरासह परिसरातील खेड्यापाड्यांना झोडपून काढले. वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने अनेक घरांवरील टिनपत्रे कागदासारखी हवेत उडून गेली, ज्यामुळे अनेक कुटुंबे उघड्यावर आली आहेत. रस्त्याच्या कडेला असलेले जुने वृक्ष उन्मळून पडल्याची माहिती आहे. सुदैवाने, वृक्ष कोसळल्याच्या घटनांत कोणतीही जीवितहानी झाल्याचे प्राथमिक वृत्त नाही.
पाऊस सुरू होताच खबरदारीचा उपाय म्हणून आणि अनेक ठिकाणी विजेच्या तारांवर झाडांच्या फांद्या पडल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला. वादळ शमल्यानंतरही उशिरापर्यंत वीजपुरवठा सुरळीत झाला नव्हता, त्यामुळे संपूर्ण परिसर अंधारात बुडाला होता. महावितरणच्या कर्मचाऱ्यांना दुरुस्तीच्या कामात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका शेतकरी वर्गाला बसला आहे. सध्या शेतात काढणीला आलेली पिके या पावसाने मातीमोल केली आहेत. कापणीला आलेल्या पिकांचे आणि उन्हाळी पिकांचे या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे.

