मुंबई

भाजपची ‘वॉशिंग मशीन’ अन् कंगनाचे बेगडी चारित्र्य

मुंबई,(प्रतिनिधी): बॉलिवूडमधून राजकारणात प्रवेश केलेल्या आणि सतत आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहणाऱ्या कंगना रणौत यांच्यावर आता स्वराज्य शक्ती सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा करुणा धनंजय मुंडे यांनी बोचरी टीका केली आहे. भाजपमध्ये प्रवेश करून साडी नेसली म्हणजे तुमचे जुने पाप धुतले जात नाहीत. भाजप म्हणजे काय ‘वॉशिंग मशीन’ आहे का?”, असा संतप्त सवाल करत मुंडे यांनी कंगना रणौत यांच्या दुटप्पीपणाचा बुरखा फाडला आहे.

करुणा मुंडे यांनी कंगना रणौत यांच्यावर निशाणा साधताना त्यांच्या जुन्या फोटोंचा आणि वागणुकीचा संदर्भ दिला. “कंगना जी, तुमचे असे अनेक फोटो आहेत जे पाहून आजही पुरुष अस्वस्थ होतात. तुम्ही कोणत्या प्रकारचे कपडे घातले होते आणि तुमची जीवनशैली कशी होती, हे संपूर्ण जगाने पाहिले आहे. मात्र, आता भाजपमध्ये जाताच तुम्ही स्वतःला ‘ड्रायक्लीन’ समजायला लागलात आणि इतरांना चारित्र्याचे डोस पाजत सुटला आहात, ही मोठी शोकांतिका आहे,” अशा शब्दांत मुंडे यांनी आपला संताप व्यक्त केला.

करुणा मुंडे यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. कंगना रणौत यांच्या जुन्या मुलाखती आणि त्यांचे ग्लॅमरस फोटो आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. “दुसऱ्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्यापूर्वी स्वतःच्या भूतकाळाकडे पहा,” हा मुंडे यांनी दिलेला सल्ला सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. आता या टीकेला कंगना रणौत किंवा भाजप कडून काय प्रत्युत्तर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, करुणा मुंडे यांनी मांडलेल्या मुद्द्यांमुळे ‘हिंदवार्ता’च्या वाचकांमध्ये आणि सर्वसामान्यांमध्ये एका नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.

प्रियंका गांधींवरील टीकेचा घेतला समाचार

काही काळापूर्वी कंगना रणौत यांनी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. प्रियंका गांधी यांच्या मर्यादा आणि चारित्र्यावर कंगनाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. याचा समाचार घेताना करुणा मुंडे म्हणाल्या, “प्रियंका गांधी यांनी कधीही आपल्या डोक्यावरची चुनरी ढळू दिली नाही. त्यांच्या घराण्याला एक प्रतिष्ठा आहे. मात्र, ज्या स्त्रीने स्वतःच्या आयुष्यात मर्यादा पाळल्या नाहीत, तिने प्रियंका गांधींसारख्या नेत्यावर टिप्पणी करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे.”

१४ व्या वर्षी घर सोडणाऱ्यांनी मर्यादा शिकवू नयेत!

कंगना रणौत यांनी एका मुलाखतीत स्वतः कबूल केले होते की, वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी त्या घर सोडून मुंबईला पळून आल्या होत्या. या विधानाचा आधार घेत करुणा मुंडे यांनी कंगनाच्या नैतिकतेवर प्रश्न उपस्थित केले. “ज्या मुलीने अल्पवयातच आपल्या घराची मर्यादा ओलांडली आणि पळून गेल्या, त्यांनी आज दुसऱ्यांना मर्यादा आणि संस्कारांच्या गोष्टी सांगणे हास्यास्पद आहे. तुमचे बालपण आणि तुमचा संघर्ष यातून तुमचे चारित्र्य जगाला समजले आहे, त्यामुळे आता साडी नेसून ढोंगीपणा करू नका,” असा टोलाही मुंडे यांनी लगावला.

भाजप म्हणजे चारित्र्य धुण्याचे केंद्र?

सर्वात महत्त्वाचा प्रश्न उपस्थित करताना मुंडे यांनी भाजपवरही निशाणा साधला. राजकीय वर्तुळात अनेकदा चर्चेत असलेल्या ‘वॉशिंग मशीन’ या संकल्पनेचा वापर करत त्या म्हणाल्या, “इतर पक्षात असताना जे लोक चारित्र्यहीन वाटतात, ते भाजपमध्ये गेल्यावर अचानक पवित्र कसे होतात? केवळ भाजपचा झेंडा हाती घेतल्यावर किंवा साडी नेसून सभ्यपणाचा आव आणल्यामुळे तुमची जुनी कृत्ये पुसली जात नाहीत. कंगना रणौत यांना आता दुसऱ्यांना पाहून अस्वस्थ वाटू लागले आहे, पण त्यांनी आधी स्वतःचा आरसा तपासावा.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *