‘मिस एशिया वर्ल्ड’ गायत्री रोहनकर यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण
नवी दिल्ली,(प्रतिनिधी) : बुलढाणा जिल्ह्यातील संतनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगावच्या एका सामान्य कुटुंबातील असामान्य मुलगी गायत्री रोहनकर हिने आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर पुन्हा एकदा जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावले आहे. नवी दिल्लीतील वायएमसीए सभागृहात आयोजित एका भव्य आंतरराष्ट्रीय सोहळ्यात गायत्री रोहनकर यांच्या हस्ते ‘नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय शांती पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. एका जागतिक स्तरावरील पुरस्काराचे वितरण शेगावच्या मुलीच्या हस्ते होणे, ही संपूर्ण जिल्ह्यासाठी अत्यंत गौरवाची बाब ठरली आहे.
गायत्री रोहनकर ही मूळची शेगावची. एका सामान्य कुटुंबात वाढलेल्या गायत्रीने आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर ग्लॅमर आणि समाजसेवेच्या जगात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. ‘मिस एशिया वर्ल्ड’ हा किताब पटकावल्यानंतर तिने कधीही मागे वळून पाहिले नाही. तिची ही प्रगती केवळ वैयक्तिक नसून, ग्रामीण भागातील मुलींसाठी ती एक मोठी प्रेरणा ठरत आहे.

नॅशनल ग्लोबल फाऊंडेशनतर्फे आयोजित या सोहळ्यात डॉ. विजय महाराणा यांना त्यांच्या योग आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल ‘नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय शांती पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. यावेळी मंचावर उपस्थित असलेल्या मान्यवरांमध्ये गायत्री रोहनकर प्रामुख्याने आकर्षण ठरली. तिच्या हस्ते सन्मान स्वीकारताना डॉ. महाराणा यांनीही तिचे कौतुक केले. कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक राजीव मेनन, इंटरनॅशनल क्वीन अवॉर्ड विजेती सोनिया भटनागर, नेपाळची प्रख्यात अभिनेत्री नीतू कोइराला यांच्यासह राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते.
शेगावात आनंदाचे वातावरण
गायत्रीने दिल्लीत मिळवलेल्या या सन्मानाची बातमी समजताच शेगावसह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे. संतांच्या या पावन भूमीतील मुलीने आपल्या संस्कारांची आणि कष्टांची शिदोरी घेऊन दिल्ली गाजवली, याचे कौतुक सर्वस्तरातून होत आहे. सामान्य परिस्थितीतून येऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःची ओळख निर्माण करणे किती कठीण असते, हे गायत्रीने आपल्या कार्यातून सिद्ध करून दाखवले आहे.
एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व
गायत्री केवळ फॅशन विश्वातच नाही, तर सामाजिक कार्यासाठीही ओळखली जाते. या पुरस्कार सोहळ्याच्या माध्यमातून तिने सिद्ध केले की, ग्रामीण भागातील टॅलेंटला जर योग्य संधी मिळाली, तर ते जागतिक स्तरावरही चमकू शकते.

