रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यासाठी मंत्रालयासमोर उपोषणाचे हत्यार
मुंबई,(प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या कामकाजावर आणि त्यांच्या काही वादग्रस्त कृतींवरून सध्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. “महिलांना न्याय देण्याऐवजी आरोपींची सेवा करण्यातच अध्यक्षांना रस आहे का?” असा संतप्त सवाल विचारत, आता त्यांच्या राजीनाम्यासाठी मंत्रालयासमोर आमरण उपोषणाचा पवित्रा घेणार आहे. जोपर्यंत चाकणकर आपल्या पदाचा राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा इशारा स्वराज्य शक्ती सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा करुणा धनंजय मुंडे यांनी दिला आहे.
मुंबईस्थित शांताकृज येथील करुणा मुंडे यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत बोलतांना त्यांनी उपरोक्त इशारा दिला. पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, महिला आयोगाच्या अध्यक्षांचे प्राथमिक कर्तव्य हे राज्यातील पीडित महिलांना आधार देणे आणि त्यांना न्याय मिळवून देणे हे असते. मात्र, रूपाली चाकणकर यांच्या बाबतीत धक्कादायक चित्र समोर आले आहे. बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अशोक खरात यांच्यावर छत्री धरून त्यांना सावली देणे, ही कृती एका महिला आयोग अध्यक्षाला शोभते का? असा सवाल जनतेतून विचारला जात आहे. ज्या व्यक्तीवर गंभीर आरोप आहेत, त्यांच्या पादुकांचे पूजन करतानाचे फोटो समोर आहेत. ही कसली निष्ठा आणि कसली संस्कृती? असा प्रश्न उपस्थित करत महिलांच्या सुरक्षिततेचे प्रश्न प्रलंबित असताना, केवळ रांगोळ्या काढणे आणि प्रसिद्धीच्या झोतात राहणे हेच महिला आयोगाचे काम उरले आहे का? अशी टीका देखील त्यांनी केली.
कार्यकाळ संपला तरी खुर्चीला चिकटून?
करुणा मुंडे यांनी सर्वात मोठा आक्षेप हा चाकणकर यांच्या पदोपभोगावर घेतला. रूपाली चाकणकर यांचा महिला आयोग अध्यक्षपदाचा कायदेशीर कार्यकाळ संपलेला आहे. नियमानुसार, कार्यकाळ संपल्यानंतर त्या पदावर राहण्याचा त्यांना कोणताही नैतिक किंवा कायदेशीर अधिकार उरत नाही. तरीही त्या पदाचा गैरवापर करत आहेत. राज्यातील महिलांच्या प्रश्नांकडे होणारे दुर्लक्ष आणि अध्यक्षांची संशयास्पद कार्यपद्धती यांविरुद्ध आता थेट मंत्रालयासमोर उपोषण करणार असून रूपाली चाकणकर यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा. वादग्रस्त व्यक्तींना पाठीशी घातल्याप्रकरणी त्यांची चौकशी व्हावी. जोपर्यंत राजीनामा मिळत नाही, तोपर्यंत पाण्याचा थेंबही न घेता उपोषण सुरूच राहील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
- महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- महाराष्ट्रात गेल्या काही काळात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशा वेळी महिला आयोग ही संस्था पीडितांसाठी आशेचा किरण असायला हवी. परंतु, जर आयोगाच्या प्रमुखच वादाच्या भोवऱ्यात असतील, तर सामान्यांनी न्याय कुणाकडे मागायचा? हा ‘उपाधी’चा खेळ थांबवून आता ठोस कारवाईची मागणी होत आहे. सरकार आता या वाढत्या दबावासमोर झुकणार की रूपाली चाकणकर यांची पाठराखण करणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

