क्राईम जगत

शेगाव हादरले! विवाहीतेचा विनयभंग करून लग्नासाठी तगादा

अजय टप

मलकापूर,(प्रतिनिधी): पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या शेगाव शहरात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शहरातील लाल बाबा देवी मंदिर परिसरात एका २३ वर्षीय विवाहितेचा विनयभंग करून, तिला मिठीत ओढत लग्नासाठी दबाव टाकणाऱ्या एका माथेफिरू विरोधात शेगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, आरोपीच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे.

कालवड, ह.मु. अकोट रोड (शेगाव) येथील रहिवासी असलेल्या २३ वर्षीय पीडितेची दीड वर्षांपूर्वी आरोपी विशाल (रा.सावळी, ता. संग्रामपूर) याच्याशी ओळख झाली होती. या ओळखीचा गैरफायदा घेत आरोपीने पीडितेचा मोबाईल क्रमांक मिळवला आणि तो त्यांच्याशी सतत संपर्क साधू लागला. यादरम्यान त्याने काही फोटोही आपल्या मोबाईलमध्ये काढले होते. मात्र, विशाल हा दारूच्या आहारी गेल्याचे समजताच पीडितेने त्याच्याशी असलेले सर्व संबंध तोडून टाकले होते.

मंदिराच्या परिसरातच गाठले; आणि नराधमाने ओलांडली सीमा

पीडिता मागील दोन महिन्यांपासून आपल्या आईसह अकोट रोड परिसरात भाड्याने राहत आहेत. १७ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास त्या अकोट रोडवरील लाल बाबा देवी मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या. याच संधीचा फायदा घेत माथेफिरू विशाल तिथे पोहोचला. “तू माझ्याशी का बोलत नाहीस?” असा जाब विचारत भररस्त्यात पीडितेला अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

इतक्यावरच न थांबता, वाईट उद्देशाने पीडितेचा उजवा हात धरून त्यांना जबरदस्तीने मिठीत ओढले. या अचानक झालेल्या प्रकारामुळे पीडितेने आरडाओरडा केला असता, घाबरलेल्या आरोपीने त्यांना सोडले. “तू माझ्याशी फोनवर का बोलत नाहीस? माझ्याशी लग्न कर, मी तुझे लग्न दुसऱ्या कोणाशीही होऊ देणार नाही.”, अशी धमकी दिली.

आरोपी विशाल हा मागील काही दिवसांपासून पीडितेचा सतत पाठलाग करून त्यांना मानसिक त्रास देत होता. या सततच्या छळामुळे आणि धमक्यांमुळे आपल्या जीवाला धोका निर्माण झाल्याने पीडितेने शेगाव शहर पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४, ७५, ७८ आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार रामदास घटे हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *