बुलडाण्यात संतापजनक! ७० वर्षीय नराधमाचा १२ वर्षांच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार
बुलडाणा,(प्रतिनिधी): ज्या नात्यावर विश्वास ठेवून घराचे दरवाजे उघडले, त्याच विश्वासाला काळिमा फासणारी एक अत्यंत घृणास्पद घटना बुलडाणा शहरात उघडकीस आली आहे. आरास ले-आउट परिसरातील एका ७० वर्षीय वृद्ध व्यावसायिकाने आपल्याच परिचयातील १२ वर्षांच्या चिमुरडीवर पाशवी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली असून, या घटनेमुळे संपूर्ण जिल्हा हादरला आहे.
बुलढाणा शहरातील रहिवासी असलेली पीडित मुलगी (वय १२ वर्षे), जी सहकार विद्या मंदिर येथे शिक्षण घेत आहे, ती दिनांक ११ मार्च २०२६ रोजी दुपारी १२.३० ते १.३० वाजेच्या सुमारास, आरोपीच्या घरी गेली होती. यावेळी घरात कोणीही नसल्याची संधी साधून, ७० वर्षीय शंकर मंगताणी याने पीडितेच्या शरीराशी अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. आरोपीने पीडितेच्या गुप्तांगाला स्पर्श करून अत्याचार केला आणि जबरदस्तीने तिचे मुके घेऊन लैंगिक शोषण केले. ही घटना घडल्यानंतर पीडित बालिका प्रचंड दहशतीखाली होती. अखेर तिने हा सर्व प्रकार आपल्या पालकांना सांगितल्यानंतर पालकांच्या पायाखालची जमीन सरकली. १९ मार्च रोजी रात्री उशिरा बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम ६४(२)(i), ६४(२)(m), ६५(१), ७५(१)(i), पोक्सो कायद्याचे कलम ४(२), ६, ८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून बुलडाणा शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक रवी राठोड यांनी तात्काळ दखल घेतली. या प्रकरणाचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक सुषमा पाटील यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
‘आजोबा’ वयाचा आरोपी निघाला नराध
या प्रकरणातील फिर्यादी आणि आरोपी शंकर झंगलमल मंगताणी (वय ७० वर्ष) हे एकाच समाजाचे असून त्यांचे कौटुंबिक संबंध अत्यंत जिव्हाळ्याचे होते. एकमेकांच्या घरी सतत येणे-जाणे असल्याने पीडितेच्या कुटुंबाचा आरोपीवर डोळे झाकून विश्वास होता. मात्र, याच विश्वासाचा फायदा घेत या नराधमाने माणुसकीला लाजवेल असे कृत्य केले.
समाजात संताप:नराधमांना कठोर शासन व्हावे!
७० वर्षे वय असलेल्या व्यक्तीकडून अशा प्रकारच्या नीच कृत्याची अपेक्षा कोणालाही नव्हती. “समाजात पांढरपेशी मुखवटा घालून वावरणाऱ्या अशा लांडग्यांना भरचौकात फाशी द्यावी,” अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांमधून उमटत आहे. चिमुरड्या मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी विविध संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

