क्राईम जगत

बुलढाणा जिल्ह्यात एकाच दिवशी तीन महिला बेपत्ता

अजय टप

मलकापूर,(प्रतिनिधी) : जिल्ह्यात महिला आणि मुली बेपत्ता होण्याचे सत्र थांबताना दिसत नाहीये. १८ मार्च २०२६ रोजी जिल्ह्यातील तीन वेगवेगळ्या पोलीस स्टेशन अंतर्गत तीन महिला बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अमडापूर पोलीस स्टेशन हद्दीतून एक विवाहित महिला, नांदुरा पोलीस स्टेशन हद्दीतून एक तरुणी, तर त्यापाठोपाठ जळगाव जामोद तालुक्यातील पळसखेड येथील विवाहिताही बेपत्ता झाल्याची घटना घडली. एकाच दिवशी घडलेल्या या तीन घटनांमुळे जिल्हाभरात चिंता व्यक्त केली जात आहे.

जळगाव जामोद पोलीस स्टेशनमध्ये दाखल तक्रारीनुसार, पळसखेड येथील रहिवासी मंगला अरुण सोळंके (वय ३५ वर्षे) या १८ मार्च रोजी दुपारी १.३० ते २ वाजेच्या सुमारास घरातून काहीही न सांगता निघून गेल्या. त्यांचे पती अरुण धोंडू सोळंके यांनी याप्रकरणी जळगाव जामोद पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी मिसिंग दाखल केली आहे. मंगला यांचा रंग गोरा, केस लांब सरळ, उंची ५ फूट २ इंच असून त्यांनी अंगात जांभळ्या रंगाची साडी आणि ब्लाऊज घातलेले आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार भागवत उंबरहांडे हे करीत आहेत. विशेष म्हणजे अमडापूर पोलीस स्टेशन हद्दीतून एक महिला, तर नांदुरा पोलीस स्टेशन हद्दीतून एक तरुणी देखील बेपत्ता झालेली आहे. एकाच तारखेला वेगवेगळ्या तीन पोलीस स्टेशन हद्दीतून महिला आणि मुली बेपत्ता झाल्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या महिलांबाबत काहीही माहिती मिळाल्यास, संबंधित पोलीस स्टेशनशी किंवा नियंत्रण कक्षाशी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *