मुख्यमंत्र्यांचे राजीनाम्याचे आदेश! महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचा ‘काऊंटडाऊन’ सुरू
मुंबई,(प्रतिनिधी): राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या राजकीय कारकिर्दीला भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणामुळे ग्रहण लागले असून, त्यांचे अध्यक्षपद आता संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. नाशिकमधील स्वयंघोषित ज्योतिषी आणि महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणात अटकेत असलेल्या अशोक खरात याच्याशी असलेल्या घनिष्ठ संबंधांमुळे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चाकणकर यांना तात्काळ पदाचा राजीनामा देण्याचे आदेश दिल्याची अधिकृत माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे. या वृत्ताने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
नाशिकमधील अशोक खरात याला महिलांचे लैंगिक शोषण आणि फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. या प्रकरणात रूपाली चाकणकर यांचे खरातसोबतचे काही आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. विशेष म्हणजे, एका व्हिडिओमध्ये चाकणकर या खरातचे पाय धुताना (पाद्यपूजा) दिसत असल्याने महिला आयोगाच्या अध्यक्षांचे हे वर्तन नैतिकतेला धरून नसल्याची टीका होत आहे. खरातच्या एका ट्रस्टमध्ये चाकणकर या स्वतः ‘ट्रस्टी’ असल्याचेही उघड झाले असून, यामुळे त्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक आक्रमक चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चाकणकर यांनी मुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालकांची भेट घेऊन आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, पुराव्यांची तीव्रता पाहता सरकार त्यांना अभय देण्याच्या मनस्थितीत नसल्याचे दिसत आहे. आगामी काही तासांतच रूपाली चाकणकर यांचा अधिकृत राजीनामा राजभवन किंवा मुख्यमंत्री सचिवालयात पोहोचण्याची दाट शक्यता आहे.
मुख्यमंत्र्यांचा कडक पवित्रा
महिलांच्या हक्कांचे रक्षण करणाऱ्या घटनात्मक पदावर बसलेली व्यक्ती जर अशा गंभीर आरोपांखाली अडकलेल्या भोंदू बाबाची भक्त असेल, तर समाजात चुकीचा संदेश जातो, अशी भूमिका मुख्यमंत्री कार्यालयाने घेतली आहे. आज २० मार्च रोजी मुख्यमंत्र्यांनी चाकणकर यांना पाचारण करून, या प्रकरणाचा सरकारवर डाग पडू नये म्हणून त्यांना सन्मानाने पायउतार होण्याचे निर्देश दिले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, चाकणकर यांनी अद्याप अधिकृतपणे राजीनामा दिलेला नसला तरी, पक्षाच्या वरिष्ठांकडून त्यांच्यावर प्रचंड दबाव निर्माण झाला आहे.
विरोधकांचा तुफान हल्ला
या प्रकरणावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणाचा कडाडून निषेध करत, “केवळ राजीनामा देऊन चालणार नाही, तर रूपाली चाकणकर यांची नार्को टेस्ट करून त्यांना तात्काळ अटक करावी,” अशी आक्रमक मागणी केली आहे. पीडित महिलांना न्याय देणाऱ्या आयोगाची प्रमुखच जर अशा भोंदू बाबाला साथ देत असेल, तर राज्याची सुरक्षितता कोणाच्या हाती आहे? असा संतप्त सवाल अंधारे यांनी उपस्थित केला आहे. दुसरीकडे, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण हाके यांनीही या प्रकरणात उडी घेतली असून, २१ मार्चच्या दुपारपर्यंत चाकणकर यांचा राजीनामा न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा आणि उपोषणाचा इशारा दिला आहे. तर स्वराज्य शक्ती सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा करुणा धनंजय मुंडे यांनी देखील आक्रमक पवित्रा घेत आंदोलन करण्याचा इशारा देत राजीनाम्याची मागणी केली होती,हे विशेष!
आयोगाची प्रतिमा डागाळली
राज्य महिला आयोग ही महिलांना संरक्षण देणारी सर्वोच्च यंत्रणा आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून चाकणकर यांच्यावर होत असलेल्या वैयक्तिक आणि राजकीय आरोपांमुळे आयोगाच्या प्रतिमेला तडा गेला आहे. ज्या भोंदू बाबावर महिलांच्या शोषणाचे गुन्हे दाखल आहेत, त्याच्याशी असलेले आर्थिक आणि धार्मिक संबंध चाकणकर यांच्या राजकीय भविष्यासाठी घातक ठरले आहेत.

