मुंबई

रूपाली चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात ‘स्वराज्य शक्ती सेने’चा ऐतिहासिक विजय!

मुंबई,( प्रतिनिधी) : महाराष्ट्राच्या राजकारणात जेव्हा संघर्षाचा विषय निघतो, तेव्हा ‘करुणा मुंडे’ हे नाव सध्या वादळासारखे घोंगावत आहे. आपल्या आक्रमक शैलीसाठी आणि ‘एकला चलो रे’ या वृत्तीने व्यवस्थेशी भिडणाऱ्या स्वराज्य शक्ती सेनेच्या संस्थापिका करुणा मुंडे यांनी पुन्हा एकदा मोठा राजकीय धमाका केला आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या विरोधात २०२३ पासून त्यांनी पुकारलेल्या युद्धाला अखेर यश आले असून, चाकणकर यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. धनंजय मुंडे यांच्यानंतर आता रूपाली चाकणकर यांच्या रूपाने करुणा मुंडे यांनी दुसरी मोठी राजकीय ‘विकेट’ पाडल्याची चर्चा आता मंत्रालयापासून ते गल्लीबोळापर्यंत रंगू लागली आहे.

  • “मी जे बोलते ते करून दाखवते. अन्यायाविरुद्धचा हा लढा इथेच थांबणार नाही. ही तर फक्त सुरुवात आहे. भ्रष्ट व्यवस्थेतील प्रत्येक ‘विकेट’ पडणार!”, अशी प्रतिक्रिया स्वराज्य शक्ती सेनेच्या संस्थापिका करुणा मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

राजकारणात अनेक नेते घोषणा करतात, आश्वासने देतात, पण ती हवेत विरून जातात. मात्र, करुणा मुंडे यांनी जे बोलून दाखवले, ते करून दाखवले आहे. काही दिवसांपूर्वीच अत्यंत आत्मविश्वासाने त्यांनी जाहीर केले होते की, “येत्या सोमवारपर्यंत रूपाली चाकणकर यांचा राजीनामा घेतला जाईल.” अनेकांना ही घोषणा केवळ प्रसिद्धीचा स्टंट वाटली होती, पण आज चाकणकर यांच्या राजीनाम्याने करुणा मुंडे यांच्या शब्दाला किती वजन आहे आणि त्यांची ‘इंटेलिजन्स’ किती अचूक आहे, हे संपूर्ण राज्याने पाहिले आहे. दिलेला शब्द तंतोतंत खरा ठरवणाऱ्या मुंडे यांच्या या झंझावातामुळे विरोधकांचे धाबे दणाणले असून त्यांनी दिलेली ‘डेडलाईन’ काळ्या दगडावरची रेघ ठरली आहे!

तीन वर्षांचा एकाकी लढा आणि दिल्लीपर्यंतची धडक

हा राजीनामा म्हणजे केवळ एका पत्राचा खेळ नाही, तर तो तीन वर्षाच्या कठोर संघर्षाचा परिपाक आहे. जेव्हा सत्तेच्या वर्तुळात रूपाली चाकणकर यांचा दबदबा होता, तेव्हा म्हणजे २०२३ मध्ये त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचे धाडस केवळ करुणा मुंडे यांनी दाखवले. मुंडे यांनी केवळ आरोप केले नाहीत, तर पुराव्यांची मोठी फाईल तयार केली होती. महाराष्ट्रातील यंत्रणा ढिम्म असताना त्यांनी दिल्ली गाठली. राष्ट्रीय महिला आयोग आणि केंद्रीय वरिष्ठ नेत्यांकडे चाकणकर यांच्या तक्रारींचा पाढा वाचला. ज्यावेळी प्रशासकीय पातळीवर दखल घेतली जात नव्हती, तेव्हा त्यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. एका बाजूला मोठी राजकीय शक्ती होती आणि दुसऱ्या बाजूला केवळ करुणा मुंडे यांची जिद्द, असा हा लढा होता.

धनंजय मुंडेंच्या ‘त्या’ घटनेची पुनरावृत्ती

महाराष्ट्राच्या राजकारणात यापूर्वी जेव्हा धनंजय मुंडे यांच्या संदर्भात मोठे वादळ उठले होते, तेव्हाही करुणा मुंडे यांनी दिलेली तारीख आणि वेळ खरी ठरली होती. आजही नेमकी तशीच परिस्थिती पाहायला मिळाली. यामुळेच आता राजकीय वर्तुळात ‘करुणा मुंडे फॅक्टर’ची दहशत निर्माण झाली आहे. स्वराज्य शक्ती सेनेच्या माध्यमातून त्यांनी सुरू केलेली ही मोहीम आता भ्रष्ट आणि कर्तव्यशून्य व्यवस्थेला हादरा देणारी ठरत आहे. एका स्त्रीने ठरवले तर ती मोठ्या मोठ्या सत्ताधाऱ्यांना जमिनीवर आणू शकते, हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

स्वराज्य शक्ती सेनेचा वाढता प्रभाव

चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर स्वराज्य शक्ती सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. “हा केवळ एका व्यक्तीचा राजीनामा नाही, तर अन्यायाविरुद्ध पुकारलेल्या युद्धाचा हा दुसरा मोठा टप्पा आहे,” अशा भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या आहेत. करुणा मुंडे यांची आक्रमक भूमिका आणि अचूक टायमिंग यामुळे आता ‘स्वराज्य शक्ती सेना’ ही राज्यातील एक महत्त्वाची राजकीय शक्ती म्हणून उदयास येत आहे.

आता पुढचे लक्ष्य कोण?

एकामागून एक मोठे राजकीय धक्के दिल्यानंतर आता संपूर्ण राज्याचे लक्ष करुणा मुंडे यांच्या पुढच्या हालचालीकडे लागले आहे. चाकणकर यांचा राजीनामा झाल्यानंतर आता स्वराज्य शक्ती सेना कोणाच्या भ्रष्टाचाराचा बुरखा फाडणार? पुढची ‘डेडलाईन’ कोणाला मिळणार? अशा प्रश्नांनी राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. तीन वर्ष सलग तक्रारी देऊन, दिल्ली ते गल्ली पाठपुरावा करून मिळवलेला हा विजय करुणा मुंडे यांच्या राजकीय कारकीर्दीतील एक सुवर्ण क्षण मानला जात आहे. थोडक्यात सांगायचे तर, करुणा मुंडे यांनी हे दाखवून दिले आहे की, सत्य आणि चिकाटीच्या जोरावर सत्तेच्या सर्वोच्च शिखरावर बसलेल्या व्यक्तीलाही खाली खेचता येते. आता ‘स्वराज्य शक्ती’चा हा रथ पुढे कोणाकडे वळतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *