महाराष्ट्र माझा

विशेष रिपोर्ट: करुणा मुंडेंचा नाशिक दौऱ्यांवरून खळबळजनक दावा

नाशिक,(प्रतिनिधी): राजकीय वर्तुळात सध्या पुन्हा एकदा आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. ‘स्वराज्य शक्ती सेने’च्या राष्ट्रीय अध्यक्षा करुणा धनंजय मुंडे यांनी नुकत्याच दिलेल्या एका विधानाने खळबळ उडवून दिली आहे. रूपाली चाकणकर आणि अशोक खरात यांचे सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो, धनंजय मुंडे यांचे वारंवार होणारे नाशिक दौरे आणि काही नेत्यांच्या संपत्तीचे गूढ यावर करुणा मुंडे यांनी अत्यंत टोकदार भाष्य केले आहे. या विधानांमुळे आता राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर रूपाली ठोंबरे पाटील आणि अशोक खरात यांचे काही फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या फोटोंचा संदर्भ देत करुणा मुंडे म्हणाल्या की, “फोटोंमध्ये स्पष्ट दिसत आहे की रूपाली ताई अशोक खरात यांना काहीतरी खाऊ घालत आहेत आणि अगदी नतमस्तक होऊन चरणाशी बसल्या आहेत. हे दृश्य पाहून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.” आज महिलांची सामाजिक आणि राजकीय परिस्थिती अत्यंत बिकट असताना, मोठ्या पदावर असलेल्या महिलांना अशा प्रकारे ‘लक्ष्य’ केले जात आहे का? की यामागे काही वेगळेच मेख आहे? करुणा मुंडे यांच्या मते, यापूर्वीही अनेक मोठे मंत्री आणि राजकीय व्यक्ती अशा वादात सापडल्या आहेत, परंतु या प्रकरणातील सत्य समोर येणे गरजेचे आहे.

राजकारण हे आता केवळ विकासाच्या मुद्द्यावर राहिलेले नसून ते वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपांच्या पातळीवर आले आहे. करुणा धनंजय मुंडे यांच्या या विधानांमुळे येणाऱ्या काळात नाशिक आणि मुंबईच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता शासन आणि प्रशासन यावर काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

“नाशिकला नक्की कशासाठी जाता?” – धनंजय मुंडेंवर थेट निशाणा

करुणा मुंडे यांनी आपल्या विधानात राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी विचारले की, “धनंजय मुंडे वारंवार नाशिकला का जातात? दरवेळी ‘मी नाशिकला जातोय’ असे सांगून ते तिथे नक्की काय करतात, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.” नाशिकमधील काही विशिष्ट आश्रमांशी असणारे संबंध आणि तिथे होणाऱ्या हालचाली संशयास्पद असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्या पुढे म्हणाल्या की, “या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. संबंधित व्यक्तींचे CDR (Call Detail Records) काढले गेले पाहिजेत. ते कोणाशी बोलत होते, काय बोलत होते आणि त्यांचे गुप्त व्यवहार काय आहेत, हे जनतेसमोर आले पाहिजे.”, असेही त्यांनी म्हटले आहे.

कोट्यवधींची संपत्ती आणि ‘रेकॉर्ड’वरचा आकडा

भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर बोलताना करुणा मुंडे यांनी संपत्तीच्या आकड्यांवरूनही निशाणा साधला. “ज्या व्यक्तींना आज पाठिंबा दिला जातोय, त्यांच्याकडे कागदोपत्री २-३ कोटींची संपत्ती दिसत असली, तरी प्रत्यक्षात ती २-३ हजार कोटींच्या घरात असण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे अनेक आमदार आणि मंत्री यांचे फोटोही अशा संशयास्पद ठिकाणी का दिसतात?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. राजकारण्यांच्या या अफाट संपत्तीची चौकशी ‘ईडी’ किंवा सीबीआयमार्फत का होत नाही, असा प्रश्न आता सामान्य नागरिकांच्या मनातही निर्माण होत आहे. केवळ बोलण्यासाठी कोट्यवधींचे आकडे वापरले जातात, पण वास्तवात या संपत्तीचा स्रोत काय, हा कळीचा मुद्दा ठरत आहे.

महिलांची ‘विकट’ परिस्थिती आणि राजकारण

करुणा मुंडे यांनी महाराष्ट्रातील महिलांच्या राजकीय संघर्षावरही भाष्य केले. त्या म्हणाल्या की, जेव्हा एखादी महिला राजकारणात पाय रोवून उभी राहण्याचा प्रयत्न करते, तेव्हा तिला बदनाम करण्याचे किंवा तिच्यावर चिखलफेक करण्याचे प्रयत्न जाणीवपूर्वक केले जातात. रूपाली चाणकणकर यांच्या संदर्भात होत असलेली चर्चा ही वैयक्तिक द्वेषातून आहे की राजकीय षडयंत्रातून, हे शोधणे आता तपास यंत्रणांचे काम आहे.

निष्पक्ष चौकशीची गरज

या सर्व वादात एक गोष्ट स्पष्ट आहे की, करुणा मुंडे यांनी उपस्थित केलेले प्रश्न केवळ आरोप नसून ते चौकशीची मागणी करणारे आहेत. जर खरोखरच यात काही गैरप्रकार असेल, तर ते समोर आले पाहिजे आणि जर हे फोटो किंवा दौरे केवळ अफवा असतील, तर तसेही स्पष्ट व्हायला हवे. त्यामुळे तपास यंत्रणेने अशोक खरात आणि रूपाली चाकणकर यांच्या व्हायरल फोटोंमागचे खरे वास्तव काय? धनंजय मुंडे यांच्या नाशिक दौऱ्यांचा आणि आश्रमाचा संबंध काय? राजकीय नेत्यांच्या संपत्तीच्या ‘रेकॉर्ड’मध्ये तफावत का आहे?, याची निष्पक्षचौकशी करण्याची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *