शेगाव हादरले!”तू माझ्याशी बोलली नाही तर तुकडे करीन”; विधी संघर्षग्रस्त बालकाची पीडितेला जिवे मारण्याची धमकी!
अजय टप
मलकापूर, (प्रतिनिधी): संत गजानन महाराजांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या शेगाव नगरीत माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. सिद्धेश्वर नगर, गौलखेड रोड परिसरात एका १७ वर्षीय विधी संघर्षग्रस्त बालकाने जातीवाचक शिवीगाळ करत एका निरागस मुलीचा छळ मांडला. केवळ छळच नाही, तर “माझ्याशी बोलली नाही तर तुला आणि तुझ्या भावाला जिवे मारून टाकीन,” अशी उघड धमकी देऊन या दहशत माजवली होती. या प्रकरणात धक्कादायक बाब म्हणजे, मुलाला समजावण्याऐवजी त्याचे आई-वडील देखील या गुन्ह्यात सामील झाले असून, शेगाव शहर पोलिसांनी विधी संघर्षग्रस्त बालकासह त्याच्या आई-वडिलांवर पोक्सो आणि अट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
सिद्धेश्वर नगर, गौलखेड रोड, (शेगाव) येथील रहिवासी असलेल्या ४२ वर्षीय महिला घरकाम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मागील सव्वा वर्षांपासून म्हणजे जानेवारी २०२५ ते १४ मार्च २०२६ पर्यंत विधी संघर्षग्रस्त बालक हा त्यांच्या अल्पवयीन मुलीचा सातत्याने पाठलाग करत होता. नव्हेतर पीडितेवर “माझ्याशी बोल” म्हणून दबाव टाकत होता. जेव्हा पीडितेने त्याला प्रतिसाद दिला नाही, तेव्हा त्याने आपल्या क्रूरतेचे दर्शन घडवले. “तू जर माझ्याशी बोलली नाही, तर तुला आणि तुझ्या लहान भावाला मी जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी त्याने पीडितेला वारंवार दिली. यामुळे संबंधित अल्पवयीन मुलगी प्रचंड मानसिक तणावाखाली होती. हा प्रकार पीडितेच्या कुटुंबीयांच्या लक्षात आला, तेव्हा विधी संघर्षग्रस्त बालकास समज देण्याऐवजी त्याचे वडील संजय बोबडे आणि आई हेमा संजय बोबडे यांनी चक्क पीडितेच्या घरासमोर येऊन रणकंदन केले. या तिघांनीही फिर्यादीच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करत त्यांना जातीवाचक हीन दर्जाची वागणूक दिली, अश्लील भाषेत शिवीगाळ केली आणि संपूर्ण कुटुंबाला “जिवंत कापून टाकू” अशी धमकी दिली. आरोपींच्या या दहशतीमुळे पीडितेचे कुटुंब भीतीच्या सावटाखाली वावरत होते. अखेर अन्यायाविरुद्ध आवाज उठवत त्यांनी शेगाव शहर पोलीस स्टेशन गाठले.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, शेगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार निमिष मेहेत्रे यांनी तातडीने तक्रार दखल घेण्याचे आदेश दिले. १८ मार्च २०२६ रोजी या प्रकरणी विधी संघर्षग्रस्त बालकासह त्याच्या आई वडिलांविरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम ७५, ७८, ३३३, ३५१, (२)३५२ पोक्सो कायद्याचे कलम १२, अट्रॉसिटी कायद्याचे कलम ३(i)(w)(i)(ii) आणि ३(२)(VA) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील हे करत आहेत. या कारवाईमुळे सिद्धेश्वर नगर परिसरात खळबळ उडाली आहे. “गुन्हेगारांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही, मग तो अल्पवयीन असो वा सज्ञान,” असा कडक संदेश पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांची घटनास्थळी धाव; परिसरात खळबळ!
गुन्हा दाखल होताच अवघ्या एका तासात उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांनी शेगाव शहर गाठले. त्यांच्यासोबत ठाणेदार निमिष मेहेत्रे आणि पीएसआय बरिंगे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पीडित कुटुंबाला संरक्षण देण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.
समाजकंटकांना इशारा!
एकीकडे महिला सुरक्षेचे दावे केले जात असताना, शेगावमधील ही घटना समाजाच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उभे करणारी आहे. एका घरकाम करणाऱ्या महिलेच्या मुलीचा अशा प्रकारे छळ होणे आणि त्यात आरोपीच्या पालकांनीच गुन्हेगाराला साथ देणे, हे निषेधार्ह आहे. मात्र, शेगाव पोलिसांनी ज्या वेगाने पोक्सो आणि अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे, त्यावरून गुन्हेगारांचे आता काही खैर नाही, हे स्पष्ट झाले आहे.

