खामगावात घरातील इलेक्ट्रिक सामानावर डल्ला
अजय टप
मलकापूर, (प्रतिनिधी): पोटच्या मुलाने कष्टाने कमावलेल्या आणि व्यवसायासाठी साठवून ठेवलेल्या इलेक्ट्रीकल साहित्यावर स्वतःच्या वडिलांनीच डल्ला मारल्याची धक्कादायक घटना सजनपुरी भागात उघडकीस आली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, यामध्ये एका भंगार विक्रेत्याचाही समावेश आहे.
शहरातील साजनपुरी परिसरात राहणारा मंगेश भिका भगतपुरे ( वय २१ वर्षे) हा तरुण व्यवसायाने इलेक्ट्रिशियन आहे. त्याने आपल्या व्यवसायासाठी लागणारे वायरचे बंडल्स, स्विचेस आणि इतर साहित्य राहत्या घरात साठवून ठेवले होते. २६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ ते रात्री ८ वाजेच्या दरम्यान, मंगेश घरात नसताना त्याच्याच वडिलांनी, भिका लक्ष्मण भगतपुरे (वय ४५ वर्षे) यांनी घरातील २ मिमीचे १८० मीटर, २.५ मिमीचे ६०० मीटर आणि ४ मिमीचे १८० मीटर वायर बंडल्स, ६ एम्पियरचे ४० नग स्विचेस, २० नग सॉकेट्स, रेग्युलेटर, राऊंड प्लेट्स आणि मॉड्युलर कव्हर फ्रेम हे इलेक्ट्रिक साहित्य, असे एकूण किंमत ४७ हजार २३० रुपयांच्या महागड्या इलेक्ट्रिक सामानाची चोरी केली. साहित्य केवळ चोरलेच नाही, तर ते ओमकारेश्वर स्मशानभूमी परिसरातील एका भंगार दुकानदाराला विकून टाकले. या प्रकरणात पोलिसांनी दुसरा आरोपी म्हणून अप्पू पठाण (रा.ओमकारेश्वर स्मशानभूमी जवळ) याला नामनिर्देशित केले आहे. चोरीचे साहित्य असल्याचे माहित असूनही किंवा तशी शंका घेण्यास वाव असतानाही, अप्पू पठाण याने स्वार्थापोटी ते साहित्य विकत घेतले.
या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेचे कलम ३०३ (२) आणि ३१७ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार संदीप टाकसाळ करत आहेत. घरातीलच व्यक्तीने अशा प्रकारे चोरी करून बाहेर माल विकल्यामुळे परिसरात या घटनेची मोठी चर्चा सुरू आहे. कष्टाने उभा केलेला व्यवसाय अशा घरगुती वादामुळे अडचणीत आला आहे.

