क्राईम जगत

नराधमाचे संतापजनक कृत्य!अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून बेदम मारहाण

अजय टप

मलकापूर,(प्रतिनिधी): माणुसकीला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना मोताळा तालुक्यातील माळेगाव येथे घडली आहे. एका ४० वर्षीय नराधमाने शेजारी राहणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला घरात ओढून तिचा विनयभंग केला आणि विरोध केला असता तिला बेदम मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, पोलिसांनी आरोपीविरुद्ध पोक्सो आणि ॲट्रॉसिटी अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल केले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि आरोपी कैलास भागवत भांचे हे शेजारी-शेजारी राहतात. १९ मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास, जेव्हा पीडितेची आई आणि मावशी घरात होत्या, तेव्हा आरोपीच्या आईने पीडितेची दिशाभूल केली. “गुढीपाडव्याचे जेवण आहे, ते घेऊन जा,” असे सांगून तिला घरात बोलावले. निरागस मुलगी जेवण घेण्यासाठी घरात गेली असता, दबा धरून बसलेल्या आरोपी कैलास भांचे याने तिचा रस्ता अडवला. पीडिता स्वयंपाकघरात शिरताच आरोपीने तिचे दोन्ही हात धरून तिचे तोंड दाबले आणि अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा पीडितेने हिंमतीने त्याला विरोध केला, तेव्हा या नराधमाचा क्रूर चेहरा समोर आला. त्याने पीडितेचे केस धरून तिला दोन्ही गालावर चापटबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता तिच्या पाठीवरही प्रहार केले आणि जातीवाचक शिवीगाळ करत “कुणाला सांगितले तर जीवे मारीन,” अशी धमकी दिली. पीडितेच्या आईने तिला आवाज दिला असता, घाबरलेल्या आरोपीने तिला लोटून दिले. पीडिता रडत रडत घराबाहेर पडली आणि तिने आपली आपबिती आई, वडील आणि मामाला सांगितली. संतापलेले नातेवाईक जेव्हा आरोपीला जाब विचारण्यासाठी गेले, तेव्हा त्याने कोणत्याही पश्चात्तापाशिवाय “हो, मी मारले,” असे उद्धटपणे सांगून घरात पळ काढला.

पीडितेच्या तक्रारीवरून धामणगाव बढे पोलिसांनी आरोपी कैलास भागवत भांचे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४, ७५(१)(२), ११५(२), ३५१(२), ३५२ तसेच पोक्सो कायदा कलम ८, १२ आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून बुलढाणा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली असून पुढील तपास त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

आता तरी न्याय मिळणार का?

एकीकडे आपण सण-उत्सव साजरे करत असताना, दुसरीकडे शेजारीच राहणाऱ्या नराधमांकडून अशा प्रकारे मुलींवर अत्याचार होत असतील, तर महिला सुरक्षित कुठे? पीडिता दलित समाजाची आहे हे माहित असूनही आरोपीने केलेले हे कृत्य केवळ विनयभंग नसून सामाजिक सौहार्दाला तडा देणारे आहे. या नराधमाला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी आता माळेगावसह संपूर्ण जिल्ह्यातून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *