स्मार्ट बुलढाणा

‘बोल आई भवानी की जय’च्या गजरात हजारो भाविकांनी घेतले कामक्षा देवीच्या सोंगाचे दर्शन

आनंद इंगळे

सिंदखेड राजा,(प्रतिनिधी): येथील ग्रामदैवत श्रीकामक्षा देवीच्या सोंगाचा उत्सव उत्साहात पार पडला. गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी पार पडलेल्या या उत्सवात हजारो भविकांनी श्रीकामक्षा देवीच्या सोंगाचे मनोभावे दर्शन घेतले. येथीलच घनशाम पंडित यांच्या वाड्यातील देवीचे प्रकटस्थान असलेल्या मंदिराच्या प्रांगणात पहाटे ५ वाजता देवीचे सोंग सजवण्यात आले. व्यघ्रावर स्वार, शेंदूरलिंपीत मळवट मुख, नयनी काजळ, दोन्ही हातामध्ये लिंबे खोवलेली तलवार, मानेवर रूळणारे कुंतल, पायामध्ये पैंजन, हिरवी साडीचोळी व हिरवा चुडा परिधान केलेले श्रीकामक्षा मातेचे विलक्षण तेजोमय अशा अलौकिक रूपाचे दर्शन हजारो भविकांनी आपल्या नजरेत सामावले असल्याचे यावेळी पहावयास मिळाले.

सूर सनईच्या मंगलमय स्वरात,डफड्यांच्या रौद्र निनादात, झांजेच्या मंजुळ तालामध्ये,समोर हातामध्ये अग्नीचे भंदे नाचवत,पावली खेळत पहाटे ५.३० च्या सुमारास ‘आई भवानी की जय’चा जयघोष करीत देवीच्या सोंगाचे मंदिराच्या दरबारात शुभागमन झाले. यावेळी गगनचुंबी फटाक्यांच्या अतिशबाजीने देवीच्या सोंगाचे स्वागत करण्यात आले.येथील कामक्षादेवी मंदिराच्या प्रांगणात पंचपदी खेळण्यात आली व चित्तथरारक असा दैत्यमर्दनाचा सोहळा पार पडला. दैत्यमर्दन झाल्यानंतर शांत झालेल्या देवीची श्रीकामक्षा देवीचे पारंपरिक विश्वस्थ असलेल्या राजेजाधव मंडळीच्या वतीने मानाची महाआरती करण्यात येऊन देवीची खणानारळाने ओटी भरण्यात आली. त्यानंतर देवीच्या सोंगाची संपूर्ण ग्रामप्रदक्षणा करण्यात आली. देवीच्या सोंगाचा मार्ग जिथून असतो तो सर्व मार्ग सुवासीनींनी स्वागतासाठी सडासंमार्जन करून, रांगोळीने सुशोभीत करून पायघड्या अंथरून ठेवला होता. ग्रामप्रदक्षणे पश्चात सकाळी १०.३० च्या सुमारास घनशाम पंडित यांच्या वाड्यात जाऊन आरती होऊन देवीचे सोंग उतरण्यात आले.

दरम्यान तमाम भाविकांच्या उपस्थितीत पुढील वर्षीच्या पाडव्याची घोषणा सोहळ्याचे विश्वस्थ राजेजाधव मंडळीच्या वतीने करण्यात आली असून बालकाकडून काढण्यात आलेल्या ईश्वरचिट्ठीमधून विष्णू एकनाथ सानप यांचे नाव पुढील वर्षीच्या पाडव्याचे मानकरी म्हणून घोषित करण्यात आले आहे. यावेळी उपस्थित हजारो भक्तांच्यावतीने विष्णू सानप यांचे गुलाल उधळून अभिनंदन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *