क्राईम जगत

“तुझ्या दोन्ही मुलींना घे आणि कोठेही निघून जा, मला फारकत दे”

अजय टप

मलकापूर,(प्रतिनिधी): चारित्र्यावर संशय घेऊन विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याची धक्कादायक घटना शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पाडसुळ येथे उघडकीस आली आहे. किरकोळ घरगुती कारणावरून वाद घालून विवाहितेचा छळ करणाऱ्या पती, सासरे आणि दिराविरुद्ध शेगाव ग्रामीण पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

पाडसुळ येथील पुजा भगवान बिलेवार (वय २५ वर्षे) यांचा विवाह आरोपी भगवान प्रकाश बिलेवार याच्याशी झाला होता. लग्नानंतर काही काळ सुखात गेल्यानंतर, सासरच्या मंडळींनी क्षुल्लक कारणावरून पुजा यांना त्रास देण्यास सुरुवात केली. २० मार्च २०२६ रोजी आणि त्यापूर्वी, आरोपींनी संगणमत करून फिर्यादी पुजा यांना “मी तुला नांदवणार नाही, तू बदमाश आहेस” असे म्हणून अपमानित केले. इतकेच नव्हे तर, “तुझ्या दोन्ही मुलींना घे आणि कोठेही निघून जा, मला फारकत दे” अशी मागणी करत आरोपींनी मानसिक छळाची सीमा ओलांडली. धक्कादायक बाब म्हणजे, आरोपींनी फिर्यादी पुजा यांच्या चारित्र्यावर संशय घेतला. “तुझे दुसऱ्या पुरुषासोबत संबंध आहेत” असा खोटा आरोप करून तिला शारीरिक मारहाण करण्यात आली. आरोपींनी तिला चापटबुक्क्यांनी मारहाण करत अश्लील शिवीगाळ केली आणि भविष्यात जीवाने मारण्याची धमकीही दिली. या सततच्या जाचाला कंटाळून अखेर पीडित महिलेने पोलिसांत धाव घेतली.

या प्रकरणी पुजा बिलेवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून शेगाव ग्रामीण पोलिसांनी आरोपी भगवान प्रकाश बिलेवार (पती), प्रकाश पुंजाजी बिलेवार (सासरे) आणि सतिश प्रकाश बिलेवार (दीर) सर्व रा. पाडसुळ (ता. शेगाव) यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ८५, ३५२, ३५१(२), ३५१(३), ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक धनराज माने हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *