क्राईम जगत

बुलडाणा-मलकापूर रोडवर लिफ्ट देऊन मजुराला लुटले

अजय टप

मोताळा (प्रतिनिधी): बुलडाणा-मलकापूर राज्य महामार्गावर लिफ्ट देण्याच्या बहाण्याने एका गरीब मजुराची रोख रक्कम लुटल्याची खळबळजनक घटना नुकतीच समोर आली आहे. मात्र, गुन्हेगारांपेक्षा पोलिसांचे ‘नेटवर्क’ आणि तंत्रज्ञान किती प्रबळ आहे, याचा प्रत्यय बोराखेडी पोलिसांनी अवघ्या दोन तासांत आरोपींना जेरबंद करून दिला आहे.

नांदुरा तालुक्यातील खडदगाव येथील रहिवासी असलेले २८ वर्षीय मंगेश सुनील घोगले हे मजुरी करून आपले कुटुंब चालवतात. २० मार्च २०२६ रोजी संध्याकाळी ७:३० वाजेच्या सुमारास ते बुलडाणा ते मलकापूर रस्त्यावरून जात होते. प्रवासासाठी साधन शोधत असताना, एमएच-१९-ईआर-२२९२ क्रमांकाच्या मोटारसायकलवरून दोन तरुण त्यांच्याजवळ आले. रात्रीची वेळ आणि प्रवासाची निकड ओळखून मंगेश यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला. या दोघांनी त्यांना गाडीवर बसवून घेतले. मात्र, चिचपूर शिवारातील बाबा पेट्रोल पंपाजवळ पोहोचताच, या दोघांनी आपले खरे रूप दाखवले. चालत्या गाडीवरच अत्यंत शिताफीने आणि संगनमत करून त्यांनी मंगेश यांच्या खिशातील ७ हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली. पैसे काढताच त्यांनी मंगेश यांना तिथेच सोडून पळ काढला. रक्ताचा पाणी करून कमावलेले पैसे डोळ्यांदेखत चोरीला गेल्याचे लक्षात येताच मंगेश यांनी तातडीने बोराखेडी पोलीस स्टेशन गाठले.

पोलिसांची चक्रे फिरली: सीसीटीव्ही ठरले ‘गेम चेंजर’

घटनेचे गांभीर्य ओळखून बोराखेडी पोलिसांनी २१ मार्च रोजी अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक सीताराम मेहत्रे यांनी तत्काळ तपासाची सूत्रे हाती घेतली आणि पथक तयार केले. तपासादरम्यान पोलिसांनी बाबा पेट्रोल पंप आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तांत्रिक बाबींचे विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांना संशयित आरोपींची माहिती मिळाली. गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकीच्या क्रमांकावरून आणि वर्णनावरून पोलिसांनी तपास चक्रावून टाकला. पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र कपले आणि त्यांच्या पथकाने वेगाने कारवाई करत अवघ्या २ तासांत शंकर श्रीराम चव्हाण (वय १८ वर्षे), रा. मोताळा आणि अमजद शाह कादर शाह, रा. बिस्मिल्ला नगर, जामनेर (जि. जळगाव), सध्या मुक्काम मोताळा या दोन तरुणांना अटक केली. नव्हेतर या दोघांकडून चोरीला गेलेली रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

‘पोलीस नेटवर्क पावरफुल्ल’

या धाडसी कारवाईमुळे परिसरात बोराखेडी पोलिसांचे कौतुक होत आहे. गुन्हेगार कितीही हुशार असले तरी कायद्याचे हात त्यांच्यापर्यंत पोहोचतातच, हे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. ही कामगिरी पोलीस निरीक्षक सीताराम मेहत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय राजेंद्र कपले, पोलीस अंमलदार नंदकिशोर धांडे, कपिश काशपाग आणि ज्ञानेश्वर धामोडे यांनी बजावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *